कोरोना विषाणूमुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कराड शहरातील पर्यटन स्थळांवर नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रितिसंगम घाटासह, कराडमधील उद्याने कोरोनामुळे शनिवारपासून बंद करण्यात आली आहेत.
गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शहरातील स्व. पी.डी. पाटील उद्यान, प्रितीसंगम उद्यान, टाऊन हॉल्न, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शिवाजी हौसिंग सोसायटी उद्यान कॉलनी आदी पर्यटन स्थळे बंद करण्याबाबत आदेश दिल्याने शनिवारी सर्व पर्यटनस्थळे बंद करण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या कराड तालुक्यातील कोरोनाबाधित पालिका क्षेत्र, वॉर्ड क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. कराड शहरात कोविड-१९ प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरीता कराड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शहारातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात यावीत , असे आशयाचे पत्र प्रांताधिकाऱ्यानी शुक्रवारी देताच शनिवारी पालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली.
शनिवारी सायंकाळी पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित पर्यटन स्थळी जाऊन ती पर्यटकांसाठी बंद केली. पर्यटन स्थळे बंद केल्यामुळे तेथील चिमुकल्यांच्या किलबिलाटाचा आवाज आता बंद झाला आहे.
No comments:
Post a Comment