Wednesday, March 24, 2021

कृष्णा कारखान्यात जे उत्कृष्ठ व्यवस्थापन आहे, ते महाराष्ट्रात इतर कुठल्याही कारखान्यात नाही ; माजी चेअरमन मदनदादांचे गौरवोद्गार...


कराड, ता. २४ : आज डॉ. सुरेश भोसले यांच्या रूपाने कृष्णा कारखान्यात जे उत्कृष्ठ व्यवस्थापन सुरू आहे, ते महाराष्ट्रात इतर कुठल्याही सहकारी साखर कारखान्यात नाही, असे गौरवोद्गार कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी काढले. शेणोली (ता. कराड) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.


याप्रसंगी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक दयानंद पाटील, निवासराव पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, ब्रिजराज मोहिते, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, सरपंच जयवंत कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभासदांशी संवाद साधताना मदनराव मोहिते पुढे म्हणाले, की कृष्णा कारखान्यास आज ६० वर्षे पूर्ण झाली. जुन्या लोकांनी कष्ट केले. कारखाना ही आपल्या चुलीशी निगडित संस्था आहे. पण अविनाश मोहितेंच्या पाच वर्षात जे घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्रात साखर कारखान्यांच्या इतिहासात जे घडले नाही ते कृष्णा कारखान्यात घडले. जवळपास ९५ दिवस माजी अध्यक्षाला तुरुंगात बसावे लागले. त्यामुळे काय चुकीचे व काय बरोबर हे आपल्याला समजायला हवे. कारखाना हे गंमतीचे ठिकाण नाही. लोकांची प्रगती झाली पाहिजे. व्यवस्थापन प्रामाणिक असेल तर कारखाना टिकेल. स्व. जयवंतराव भोसले यांनी पुढाकार घेतला म्हणून आज जलसिंचन योजना झाल्या. हा परिसर हिरवागार बघायला मिळत आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की आज आपण कारखान्याची गाळप क्षमता वाढविली. डिस्टीलरीचे आधुनिकीकरण केले. इथेनॉल प्रकल्पाची क्षमता वाढविली. कारखानदारी चांगल्या विचाराने चालवली तर टिकेल. पण मागील संचालक मंडळाने अनेक चुका केल्या, ज्या अजूनही आम्हाला भोगाव्या लागत आहेत. त्यांना गोडाऊनचे पत्रेदेखील बदलता आले नाहीत. घरात बसून कामगारांना पगार दिले गेले, ते कामगारच होते का? कार्यकर्ते पोसण्याचा प्रकार माजी अध्यक्षांनी केला. संस्था मोडून खाण्याचा उद्योग या मंडळींनी केले. आम्ही मात्र ही संस्था टिकली पाहिजे, हे एकच उद्दीष्ट ठेऊन पाच वर्षे काम केले. आज साखर कारखानदारीत पुन्हा कृष्णा पहिल्या पाचमध्ये आहे.
यावेळी सागर कणसे व त्यांच्या मित्र परिवाराने सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनोज पाटील, कृष्णा कामगार सोसायटीचे अध्यक्ष पैलवान आनंदराव मोहिते, नारायण शिंगाडे, संदीप पाटील, प्रतापराव कणसे, अधिकराव निकम, माणिकराव कणसे, प्रकाश कणसे, समीर पाटील यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment