Thursday, March 25, 2021

गुड फ्रायडे व इस्टर सन्डे उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेश

सातारा दि.25 (जिमाका): कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गुड फ्रायडे व इस्टर सन्डे  हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 11973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार  जारी केले आहेत.
याआदेशानुसार दि. 28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान "होली विक" मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. जणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होत सोशल डिस्टन्सींग राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे आयोजन करावे. भाविकांना प्रार्थनासभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल. तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था चर्चचे व्यवस्थापक यांनी करावी. चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या वेळी ऑनलाईन प्रक्षेपाणाची सुविधा उपलबध करुन देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटस्ॲप, फेसबुक, युट्युब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रासरीत करावे. चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नयेत. तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. या आदेशापेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा यानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. या आदेशानंतर काही नवीन सूचना  प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 
या आदेशाची संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भातीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.  
0000

No comments:

Post a Comment