Wednesday, March 17, 2021

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस... राजकीय क्षेत्रातील या एव्हरग्रीन नेत्याने वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे...

 माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आज वाढदिवस. राजकीय क्षेत्रातील या एव्हरग्रीन नेत्याने वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. अत्यंत फिट दिसणाऱ्या पृथ्वीबाबांना पाहून त्यांनी पाऊणशे वयोमान गाठल्याचा कोणालाही विश्वास बसणार नाही. चव्हाण हे सध्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 
त्यांच्याविषयी जाणून घ्या थोडक्यात...

वडिलांकडून राजकीय वारसा...


पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 17 मार्च 1946 रोजी इंदूरमध्ये झाला. पृथ्वीबाबा हे तीन भावंडांमधील सर्वात ज्येष्ठ. निरुपमा यादव-देशमुख आणि विद्युल्लता घोरपडे या बहिणींचा हा दादा. वडील दाजीसाहेब चव्हाण हे कराड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1957 ते 1973 या काळात पंडित जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यासारख्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात दाजीसाहेबांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलं.

आई-वडील खासदार...

दाजीसाहेबांच्या निधनानंतर 1973 मध्ये रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांच्या मातोश्री प्रेमला निवडून आल्या. त्यानंतर सलग चार वेळा त्या लोकसभेवर निवडून आल्या. दिल्लीत शिक्षण झालेल्या पृथ्वीबाबांना साहजिकच राजकारणाची गोडी लागली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात कराड येथील महापालिकेच्या मराठी माध्यम शाळेतून केली. त्यांचे वडील दिल्लीला गेल्यानंतर चव्हाण दिल्लीत नूतन मराठी शाळेत दाखल झाले. चव्हाण यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवी प्राप्त केली.

कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण...

1967 मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी जर्मनीत युनेस्कोची शिष्यवृत्ती मिळवली. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवण्यास ते बर्कलेला गेले. त्यांनी संगणक विज्ञानावर लेख लिहिले; अभियांत्रिकी डिझाइन; तसेच संगणकीकरणाच्या संशोधनातही हातभार लावला. त्यांनी डिझाइन इंजिनिअर म्हणून अमेरिकेत थोडा काळ काम केले, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीविरोधी युद्ध, संगणक संग्रहण प्रणाली आणि भारतीय भाषांचे संगणकीकरण यावर काम केले. चव्हाण यांचा विवाह 16 डिसेंबर 1976 रोजी सत्त्वशीला यांच्याशी झाला. त्यांना अंकिता आणि जय ही दोन अपत्यं आहेत. 

केंद्रात मंत्रिपद...

पृथ्वीराज चव्हाण यांनी 1991 मध्ये आपल्या पालकांनी जिंकलेली कराडची जागा जिंकून लोकसभेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1991, 1996 आणि 1998 असे सलग तीनदा ते विजयी झाले. परंतु 1999 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला. पृथ्वीराज चव्हाण यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, कार्मिक मंत्रालय, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय, संसदीय कार्य मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रभारी मंत्री म्हणून काम केले.

स्वच्छ प्रतिमा ही ओळख...

आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागल्यानंतर 2010 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्वच्छ प्रतिमा आणि राज्यात त्यांचा राजकीय समर्थक नसल्यामुळे त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली, असं त्यांच्या निवडीचे कारण माध्यमांद्वारे मानले जाई. 1 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2014 या चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले. 2014 आणि 2019 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले.

No comments:

Post a Comment