Sunday, May 15, 2022

शंभू चरित्रात कराडच्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व - प्रा. अरुण घोडके यांचे प्रतिपादन; ओघवत्या वाणीत मांडला संभाजी राजांचा धगधगता इतिहास...

वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यारोहणात कराडच्या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे
 या भूमीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीचा संकल्प करण्यात आला आहे. हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास  व्याख्याते प्रा. अरुण घोडके यांनी व्यक्त केला.
येथील शंभू तीर्थावर शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हजारो शिवप्रेमींनी या व्याख्यानास उपस्थिती लावली. संभाजीराजांचा धगधगता पराक्रम त्यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुर्गप्रेमी के. एन. देसाई, तहसीलदार विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. घोडके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनावेळी संभाजीराजे पन्हाळ्यावर होते. शिवरायांच्या पश्चात राजारामांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराड प्रांतात होते. राजाराम हा भाचा असतानाही त्यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. पुढे संभाजीराजे छत्रपती झाले. संभाजीराजांना अनेक नाटके, चित्रपट व साहित्यात बदनाम करण्यात आले. मात्र ते व्यसनी होते, असा एकही पुरावा इतिहासात आढळत नाही.
स्वराज्याचे छत्रपती म्हणून त्यांना अवघी नऊ वर्षे लाभली. या छोट्या कालखंडात त्यांनी 128 लढाया केल्या. यातील एकही लढाई ते हारले नाहीत. बुधभूषण ग्रंथासह एकूण चार ग्रंथ लिहिणारे ते एकमेव छत्रपती होते. कर्तृत्ववान, शीलवान, कर्तबगार, राष्ट्रप्रेमी पिढी घडविण्यासाठी शिवचरित्र, शंभूचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास अभ्यासला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शिवरायांच्या आज्ञेनुसार अनेक किल्ले बांधणार्या हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःच्या नावाची पायरी रायगडावर रचली. ती आपणाला निरपेक्ष सेवेची प्रेरणा देते, त्याचप्रमाणे कराडमध्ये तरुणांनी शंभू स्मारक उभारण्याचा संकल्प करून निरपेक्ष सेवेचा चिरा रोवला आहे. या कार्यास सर्व कराडकरांनी सक्रीय साथ द्यावी, असे आवाहन प्रा. घोडके यांनी केले.

व्याख्यानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभू तीर्थ (साईट व्ही) जागेत प्रथमच व्याख्यानासारखा कार्यक्रम स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने घेण्यात आला. कराडकर नागरिक, महिलांसह तरूण कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त शंभूराजांच्या पराक्रमाचा जागर करण्याच्या या संकल्पनेचे नागरिकांनी कौतुक केले.

लेझर शो प्रेक्षणीय
शंभू तीर्थावर आयोजित सोहळ्यात रात्री भव्य लेझर शोने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हजारोंच्या संख्येने तरुणाईने थिरकत लेझर शोचा आनंद घेतला.

No comments:

Post a Comment