वेध माझा ऑनलाइन - मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता असल्याची हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे.
यामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पुढील चार दिवस पाऊस पडणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अंदमानला दाखल झालेला मान्सून गेल्या तीन दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही. दरम्यान, कोल्हापूर, कोकणसह राज्यातील काही भागांत चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment