Monday, May 23, 2022

राज्यसरकारची पेट्रोल डिझेल दरकपातीची घोषणा कागदावरच; मे महिन्यात 'एप्रिल फूल' केल्याचा भाजपचा आरोप...

वेध माझा ऑनलाइन - पेट्रोल डिझेल दरकपातीसंदर्भात राज्यसरकारनं काल घोषणा केली खरी. मात्र अद्याप याबाबत कुठलेही आदेश काढलेले नाही. काल राज्यसरकारडून व्हॅट कमी केल्याची घोषणा केली आहे मात्र अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.  पेट्रोल डिझेल दरकपातीसंदर्भात राज्यसरकारची घोषणा कागदावरच असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.  महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तर सरकार महागाईबाबत गंभीर नाही असा आरोप भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे.  राज्याच्या अर्थमंत्रालयाकडून  करकपातीचा अध्यादेश अद्यापही जारी केलेला नाही. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 
फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लज्जास्पद! महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. इंधनाची मूळ किंमत,विक्रेत्यांना दिले जाणारे कमिशन,रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस तसेच अ‍ॅग्रीकल्चर अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस अशा सर्व बाबींवर राज्य सरकार करआकारणी करते.  त्यामुळे यापैकी कोणत्याही घटकातील कर केंद्राने कमी केला तर राज्याचा कर आपोआप कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. कालची घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला.


No comments:

Post a Comment