Monday, May 9, 2022

छत्रपती संभाजी महाराज जयंती भव्य स्वरूपात साजरी करणार ; कराडमध्ये शिव-शंभूप्रेमींच्या बैठकीत निर्धार; 14 मे रोजी विविध कार्यक्रम

वेध माझा ऑनलाइन - येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमींनी केला आहे. या स्मारकाच्या उभारणीअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती असून ही जयंती भव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय शिव-शंभूप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  

भेदा चौकातील शंभूतीर्थावर स्मारकाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. येथे 14 रोजी सकाळी 8.30 वाजता गुढी उभारून छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा आनंदात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भव्य सेटची उभारणी करण्यात येणार असून संपूर्ण चौकाला विद्युत रोषणाई व सजावट करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेशात रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर शंभूजन्माचा पाळणा होणार आहे. त्यानंतर व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर व्याख्यान होणार आहे.  

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संपूर्ण साकार होईपर्यंत विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराच्या वाटेवर चालण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या भव्यदिव्य कार्यात सर्वांनी कृतिशील सहभाग घ्यावा. 14 मे रोजी होणाऱया विविध कार्यक्रमांना कराड शहर व तालुक्यातील नागरिक, तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिव-शंभूप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment