वेध माझा ऑनलाइन - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून भोंगे काढण्याबाबत आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणी राज ठाकरेंविरोधात आधीच औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरीकड आता राज ठाकरेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभेत जाहीर केले होते की, विविध मशिदींमधील लाऊड स्पीकर 4 मे पूर्वी काढून टाकावे लागतील, असे न झाल्यास त्यांचे कार्यकर्ते अशा मशिदींबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील. तसंच पत्रकार परिषद घेऊन जनतेला लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास उद्युक्त केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी घेतलेल्या विविध जाहीर सभांविरोधात तक्रार केली ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बदनामीकारक भाषणे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविधानांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात निदर्शने होऊ शकतात, ज्यामुळे समाजातील शांतता भंग होऊ शकते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे.
'विविध मशिदींतील लाऊड स्पीकर 4 मे पूर्वी काढून टाकावे लागतील, अशी घोषणाही ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत केली होती, असे न केल्यास त्यांचे कार्यकर्ते अशा मशिदींच्या बाहेरील लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील. याकरिता लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणीही केली आहे.
'राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाजवण्याचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केल्याने शांतता भंग झाली आणि राज्याच्या विविध भागात दंगली सुरू झाल्या असे असतानाही ठाकरे यांच्यावर भादंवि कलम 124 अ अन्वये देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही याकरिता अधिवक्ता आर.एन. कचवे यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.
याच अनुषंगाने याचिकाकर्त्याने आयुक्त आणि मुंबई पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक यांना निवेदनही दिले होते, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, कलम 153 (दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), कलम 116 (गुन्ह्यास उत्तेजन देणे) आणि 117 (10 हून अधिक जणांनी केलेल्या गुन्ह्यास उत्तेजन देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, लाऊडस्पीकर काढून टाकण्याबाबत ठाकरे यांचे भाषण "समाजात फूट निर्माण करणे" हे उद्दिष्ट होते, अशी टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
No comments:
Post a Comment