Tuesday, May 10, 2022

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे इशारा; म्हणाले...आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका...

वेध माझा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांविरोधात सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवरुन मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. "राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही", अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची याआधीचे पत्र हे विनंती करणारे आणि मागणी मांडणारे होते. पण यावेळी त्यांनी पत्रातून थेट इशारा दिला आहे. या पत्रामध्ये राज ठाकरे यांची स्वाक्षरीदेखील आहे.

राज ठाकरे पत्रात नेमकं काय म्हणाले?
"सर्व देशबांधवांना मिशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरु करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनीप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी", असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

"महाराष्ट्र सैनिकांची गेला आठवडाभर दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकार किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून अतिरेकी आणि निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत", असं राज ठाकरे पत्रात म्हणाले.

No comments:

Post a Comment