वेध माझा ऑनलाइन। कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर उद्यापासून (ता. १७) आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाला प्रारंभ होत आहे. कराडमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा कृषी महोत्सव होत असून, विविध प्रकारचे कृषी तंत्रज्ञान एकाच छताखाली पाहायला मिळणार आहे. एकूणच कराडमध्ये उद्यापासून कृषी पंढरीच जणू अवतरणार आहे.
कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कृष्णा कृषी परिषदेच्या माध्यमातून आणि कृष्णा विश्व विद्यापीठ व कृष्णा सहकारी बँकेच्या सहकार्यातून कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या महोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
या कृषी महोत्सवाचे उद्घाटन उद्या बुधवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार श्री. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष सर्वत्र साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे प्रवेशद्वार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या संकल्पनेवर उभारण्यात आले आहे. त्याचसोबत अयोध्या येथे प्रभू श्री रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्री रामाची भव्य प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आली आहे. कराडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन होत असून, यासाठी ११ देशातील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे.
तसेच याठिकाणी शासकीय दालन, यंत्रे व औजारे दालन, गृहपयोगी वस्तूंचे दालन, महिला बचत गटांचे स्वतंत्र स्टॉल, तृणधान्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय संमेलन व खाद्यजत्रा असणार आहे. याचबरोबर महोत्सवात जातिवंत जनावरांसह अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टींचे व शेतीविषयक उपकरणांचे आकर्षण राहणार आहे. या महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा असा सोन्या बैल, देशातील सर्वांत उंच बैलासोबतच भारतातील सर्वांत लहान पुंगनूर जातीची अडीच फूट उंचीची गाय, २ टन वजनाचा रेडा, १ फूट लांबीची मिरची, दीड फुटाची लोंबी, इलेक्ट्रिक बैल हीदेखील खास आकर्षणे ठरणार आहेत. याठिकाणी ३६ देशातील पिकांचे नमुनेदेखील पाहण्यास मिळणार असल्याने, कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
विविध स्पर्धा व चर्चासत्रांचे आयोजन
या महोत्सवात बुधवारी (ता. १७) दुपारी ३ वाजता सतीश खाडे यांचे ‘पाणी व्यवस्थापन’ या विषयावर, ४ वाजता अरविंद पाटील यांचे दुग्ध व्यवसाय : भविष्यातील एक नवी दिशा, गुरुवारी (ता. १८) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान ऊस पीक, केळी व घड प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता डॉ. रामचंद्र साबळे यांचे हवामान बदल व शेती व्यवस्थापन, ४ वाजता डॉ. दशरथ तांबाळे यांचे सेंद्रीय शेती या विषयावर, शुक्रवारी (ता. १९) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान फुले प्रदर्शन व स्पर्धा तसेच म्हैस, गाय, जातिवंत खोंड, कालवड प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता डॉ. एस. डी. गोरंटीवार यांचे भविष्यातील शेती व डिजीटल तंत्रज्ञानाची आवश्यकता, दुपारी ४ वाजता श्री. शैलेश जयवंत यांचे पॅकेजिंग इंडस्ट्री या विषयावर, शनिवारी (ता. २०) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान फळे प्रदर्शन व स्पर्धा तसेच श्वान प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी १ वाजता डॉ. शांताराम गायकवाड यांचे दुग्ध व्यवसायातील नवीन संधी, दुपारी २ वाजता सौ. उमा मांगले यांचे तृणधान्य प्रक्रिया उद्योग या विषयावर, रविवारी (ता. २१) सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी ३ वाजता सुरेश कबाडे यांचे ऊस शेती तंत्रज्ञान, दुपारी ४ वाजता पाशा पटेल (अध्यक्ष, कृषी मूल्य आयोग) यांचे बांबू लागवड व प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
No comments:
Post a Comment