Tuesday, January 30, 2024

पाकिस्तानातून मोठी बातमी ; माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा ; पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ

वेध माझा ऑनलाइन। पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात इमरान खान यांना आणि त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रावळपिंडी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे

गोपनीय राजनैतिक कागदपत्रं उघड केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आल होत. मात्र आपल्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला होता. गेल्या वर्षभरापासून अडियाला कारागृहात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज कोर्टाने इम्रान खान याना दोषी ठरवत १० वर्षाची शिक्षा ठोठावली. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र तत्पूर्वीच त्यांना १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. मात्र अजूनही त्यांना या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय आहे मात्र सध्या त्यांचे आणि पाकिस्तानी लष्कराचे वाद सुरु आहेत ते पाहता त्यांना फारसा दिलासा मिळेल याची शक्यता नाही.

No comments:

Post a Comment