Sunday, January 7, 2024

मंत्री शंभूराज देसाई यांच्याबाबत सोशल मीडियावर अपशब्द वापरला ; शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन। सोशल मीडियावर उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या (शिंदे गट) तालुका प्रमुखावर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे-पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली. काकासाहेब जाधव (रा. मुंढे, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर ‘शिवसेना एकनाथ शिंदे' नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचा तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने या ग्रुपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले. अश्लिल भाषेत त्याने त्या ग्रुपवर शिविगाळ केली. संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरुन त्याने मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला याबाबतची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 


No comments:

Post a Comment