Thursday, January 25, 2024

लोणावळा सोडलं... जरांगे पाटील चालले मुंबईला... म्हणाले...आता आरक्षण घेऊनच मागे येणार ; वाचा सविस्तर

वेध माझा ऑनलाइन
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारली आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यातून मुंबईला जाण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर त्यांनी वाटेत शिष्टमंडळ भेटण्यासाठी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

काहीवेळापूर्वी जरांगे यांची काही अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. या बैठकीत त्यांना मोठे शिष्टमंडळ येत असल्याचे सांगितले होते. परंतु जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनी, दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावे असे आवाहन करत आपण दुपारपर्यंत लोणावळ्यात थांबल्याचे स्पष्ट केले होते. मला मुंबईला यायची हौस नाहीय. इथेच आरक्षण मिळाले तर तिकडे येऊन काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
याचबरोबर मोर्चात सहभागी झालेल्या मराठा समाजालाही जरांगे यांनी सावध केले आहे. मोर्चात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात द्या असे त्यांनी म्हटले आहे. हे लोक काहीही करू शकतात, मोर्चात घुसू शकतात, यामुळे मी समाजाला सावध केल्याचे जरांगे म्हणाले. 
 मी आता मुंबईला निघालो आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. मी सरकारला मदत करणारा आहे. मार्ग बदलला असेल तर मी अडवणूक करणार नाही. आम्ही त्या मार्गाने जाऊ, असेही जरांगे म्हणाले. मंत्री आणि सचिव यांचे शिष्टमंडळ येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment