वेध माझा ऑनलाइन। नवीन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. तसेच राजकीय वर्तुळातही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. असे असताना आता काँग्रेसचे नेते आणि शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वांत मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे.
शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानानिमित्त उदय सामंत आज कोल्हापूरात होते. यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सामंतांना डिवचण्यासाठी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता. या सातही खासदारांनी तशाप्रकारचं लेखी दिल्याचेही सतेज पाटलांनी खळबळजनक दावा केला होता.
सतेज पाटलांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी देखील एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. माझ्या अंदाजाप्रमाणे 8 ते 9 काँग्रेस नेते हे देखील कमळावर लढायला तयार आहेत. याची अधिकृत यादी माझ्याकडे आहे. ही नावे लवकरच जाहीर करेन,असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच जसे सतेज पाटलांनी सांगितले त्यांच्याकडे यादी आहे, तशी माझ्याकडे देखील आहे. कोण कुठे भाजपच्या लोकाना जाऊन भेटले? कोण कुठे मुख्यमंत्र्यांना भेटले? याची इत्यभूत माहिती देखील माझ्याकडे असल्याचे उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले
महायुती ही अभेद्य आहे. 48 जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तरी देखील प्रत्यक्ष पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतो. आम्ही ज्या ठिकाणी निवडणूका लढवल्या आहेत. आमचे ज्या ठिकाणी खासदार निवडून आले आहेत. तिथे स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी शिवसंकल्पाद्वारे चर्चा करणार आहेत. त्याचच नियोजन करायला आम्ही सगळे सहकारी इकडे आलो असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान आता सतेज पाटलांच्या दाव्यानुसार शिंदे गटाचे सात खासदार आणि सामंताच्या दाव्यानुसार जर 9 काँग्रेस नेते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढायला तयार झाले तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वांत मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे.
No comments:
Post a Comment