Monday, August 17, 2026

कराडच्या सोमवार पेठेत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवती जखमी; ऍड विराज जांभळे व बाळासाहेब उमराणी यांनी युवतीची कुत्र्याच्या तावडीतून केली सुटका ; याबाबत पालिका प्रशासनाला कळवून देखील दुर्लक्ष केल्याचा सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
सोमवार पेठेतील शिखरे वाड्यासमोर भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन युवतीला दुखापत झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याच कुत्र्याने एका वृद्ध महिलेवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील अनिल कुलकर्णी यांची कन्या तिच्या आईसोबत घरी जात असताना शिखरे वाड्यासमोर अचानक तेथील भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात युवतीच्या हाताला व पायाला दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेले ॲड. विराज जांभळे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब उमराणी यांनी प्रसंगावधान राखत संबंधित युवतीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. त्याचवेळी एका वृद्ध महिलेवरही त्या कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय उंडाळकर यांनी चार दिवसांपूर्वीच सोमवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची माहिती कराड पालिका प्रशासनाला दिली होती. तसेच, या कुत्र्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप उंडाळकर यांनी केला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे वडील अनिल कुलकर्णी यांनीही भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 'आज माझ्या मुलीला कुत्र्याने चावा घेतला आहे. उद्या आणखी कोणालाही या भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे सोमवार पेठ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

काँग्रेस नेते नामदेवराव पाटील यांचा आमदार अतुलबाबांना प्रश्नांचा भडिमार ;काय म्हणाले...? निवडणुकीपूर्वी १५ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते तुम्ही दोन वर्षांत काय केले, याचा हिशोब द्या...

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीच्या प्रश्नावर दक्षिण कराडचे आमदार आज पत्रकार परिषद घेऊन चव्हाण कुटुंबावर आरोप करीत आहेत. मात्र, इतरांवर आरोप करण्यापूर्वी निवडणुकीपूर्वी पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर आमदारांनी जनतेला द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नादेवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

कराडच्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्ती चा नसून जमिनीच्या मालकीचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा कायदेशीर प्रश्न आहे. संबंधित जमिनीच्या मालकीबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असल्याने या प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यास कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सरकारांच्या काळात हा प्रश्न का सुटला नाही, यावर राजकीय आरोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी स्वतः दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी काय केले, हे सांगणे अधिक महत्त्वाचे आहे.

निवडणुकीपूर्वी १५ दिवसांचे आश्वासन; आता दोन वर्षे झाली!
दक्षिण कराड विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत आमदारांनी निवडून आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनी झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावू आणि झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी जमिनीचे हक्क मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते.

आज त्या आश्वासनाला जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मग या दोन वर्षांत नेमके काय झाले? प्रश्न किती पुढे गेला? कोणते प्रस्ताव तयार झाले? कोणत्या विभागांशी बैठक झाली? न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले? याची माहिती आमदारांनी जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्वरित कारवाई’ नंतर पुढे काय झाले?
या प्रश्नासंदर्भात आमदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते आणि त्यावर ‘त्वरित कारवाई करा’ असा शेरा देण्यात आल्याचे सांगितले जाते. जर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले असतील, तर त्यानंतर प्रशासनाच्या पातळीवर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही दोन वर्षांत प्रश्न सुटला नसेल, तर त्यामागील कारण काय? संबंधित विभागांकडून कोणती माहिती मागविण्यात आली? किती बैठका घेण्यात आल्या?  कोणते प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झोपडपट्टी धारकांच्या कायम स्वरूपी पुनर्वसन अथवा जमिनीच्या हक्काबाबत आजची स्थिती काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदारांनी द्यावीत.

आश्वासन पूर्ण झाले तर स्वागतच!
पाटण कॉलनीतील झोपडपट्टी धारकांना कायम स्वरूपी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन जर प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर त्याचे निश्चितच स्वागत केले जाईल. कारण हा प्रश्न कोणत्याही पक्षाचा नसून वर्षानुवर्षे या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्नआहे.

आरोप-प्रत्यारोपांपेक्षा कामाचा लेखाजोखा द्या
कुणाच्या काळात हा प्रश्न प्रलंबित राहिला, कुणाला जमिनीच्या व्यवहाराची किती माहिती आहे, यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर त्यांनी किती काम केले, हा जनतेचा मूलभूत प्रश्न आहे.

त्यामुळे दक्षिण कराडच्या आमदारांनी इतरांवर आरोप करण्याऐवजी प्रथम पाटण कॉलनीतील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या आश्वासनाचा दोन वर्षांचा कृती अहवाल जनतेसमोर सादर करावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे




Sunday, August 16, 2026

कराडची कन्या... सई थिटे भेदक गोलंदाजीमुळे युएई संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र

वेध माझा ऑनलाईन।
मूळची कराडची आणि सध्या दुबईत वास्तव्य करणाऱ्या अवघ्या १५ वर्षांच्या सई थिटे हिने युएईच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघातील निवडीचे सोने केले. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे युएईचा संघ आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी- २० विश्वचषक आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.  संघातील सर्वात युवा खेळाडू म्हणून ती संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
 
मलेशियातील स्पर्धेत सईने उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विश्वचषक पात्रता फेरीत सईने अत्यंत निर्णायक क्षणी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवून दिले!  "युएई संघाला विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी शेवटच्या षटकात ६ धावांचा बचाव करायचा होता आणि ही महत्त्वपूर्ण शेवटची ओव्हर सईने टाकली; मलेशियाला विजयासाठी केवळ ६ धावांची गरज असताना, तिने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. शेवटच्या दोन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना, तिने केवळ एक धाव दिली आणि युएईच्या संघाने आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक आशिया कप २०२७' मधील आपले स्थान पक्के केले. संपूर्ण सामन्यातील तिची गोलंदाजी अतिशय किफायती ठरली; तिने ४ षटकांत १ बळी घेत २५ धावा दिल्या.
दहावीच्या परीक्षांच्या काळातही सईने अभ्यासासोबत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट समतोल साधला. पाचवीत असतानाच युएईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने दुबईमध्ये राहून गेली पाच वर्षे सातत्याने कठोर सराव, अथक मेहनत करून  स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. या यशामागे आई प्राजक्ता व वडील निखिल थिटे यांचे क्रिकेटवरील अपार प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा सिंहाचा वाटा आहे. 

कराडचे विशाल थिटे यांची ती पुतणी असून  पूजा साहित्यचे नारायण कुलकर्णी यांची ती नात आहे.

सामन्याचा सारांश
२९ जुलै, २०२६ स्थळ: क्वालालंपूर, मलेशिया
नाणेफेक: युएई संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएई धावसंख्या: १९.३ षटकांत सर्वबाद ९५ (अल मसीरा जहांगीर ३१)
मलेशियाची धावसंख्या: २० षटकांत ९४/६
निकाल: युएई  संघ एक धावेने विजयी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील 7 जणांनी सलग तीन निवडणुकीमध्ये दुबार मतदान केले; 70 वर्षे तुमच्या घरात राजकारणाची मोठी पदे असताना एखादा उद्योगतरी कराडात आणायचा होता, ; तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून लोकांनी तुम्हाला डावललय ; आमदार अतुलबाबांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार ;

वेध माझा ऑनलाईन। दुबार मतदान नोंदणीच्या मुद्द्यावरून कराडच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र अधिकच तीव्र झाले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपांना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कृष्णा हॉस्पिटल परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधला. स्वतःवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या मतदान नोंदणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुबार मतदानाच्या नोंदणीबाबत करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा करताना भोसले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सात जणांची विविध ठिकाणी मतदान नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मागील विधानसभा निवडणुकीतील पराभव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अद्याप स्वीकारता आलेला नसल्याचे दिसत असल्याची टीका करत, लोकांनी त्यांना नाकारल्याचे वास्तव त्यांनी मान्य करावे, असा सल्लाही भोसले यांनी दिला.

'५८ हजार बोगस मतदारांचा आकडा कुठून आला?'
दुबार मतदानाच्या मुद्यावर भाष्य करताना भोसले यांनी ५८ हजार बोगस मतदारांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. स्थलांतरित, मृत आणि इतर मतदारांची आकडेवारी लक्षात घेतली तर एवढ्या मोठ्या संख्येचा आधार काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने कोणताही आरोप करताना वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे सांगत, केवळ राजकीय आरोपांसाठी बिनबुडाचे दावे करणे योग्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.

'७० वर्षांच्या राजकीय वारशाचा हिशेब द्या'
चव्हाण कुटुंबाच्या अनेक दशकांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करताना भोसले यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात परिसराच्या विकासासाठी कोणते उद्योग आणले, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीसाठी कोणते प्रयत्न केले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
आपल्या दीड वर्षांच्या कामाचा हिशेब मागणाऱ्यांनी स्वतःच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीचे मूल्यांकन करावे, अशी टीकाही त्यांनी केली.

गोपीनाथ मुंडे आणि अमित शाह यांच्यावरील वक्तव्यांवरही आक्षेप
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याबाबत चुकीची विधाने करणे योग्य नसल्याचे भोसले म्हणाले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी संयम बाळगावा, असेही त्यांनी सांगितले.

'कराडमध्ये नेकलेस रोड होणारच'
पत्रकार परिषदेत कराडमधील बहुचर्चित नेकलेस रोड प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. हा प्रकल्प कराडच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा पुनरुच्चार करत, या प्रकल्पाचे थ्री-डी सादरीकरण सत्ताधाऱ्यांसमोर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार भोसले यांनी दिली.

Saturday, August 15, 2026

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते या... पृथ्वीराजबाबांच्या गौप्यस्फोटावर पंकजा मुंडे यांनी दिली प्रतिक्रिया -

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे. "मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मान्यता दिली होती. पण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नकार दिला होता. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस पक्षप्रवेशासाठी केंद्रात मंत्रिपदाची अट ठेवली होती. तसेच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागले. तसेच केंद्रात मंत्रिपद दिले नाही तर नागपूरचे दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले होते", असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या विषयावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या...
" आता त्यांच्याविषयी आम्ही वक्तव्य करणं उचित नाही. कारण त्यावेळी राजकारणात आम्ही  नव्हतो. याशिवाय त्याचं आता औचित्यही नाही. पृथ्वीराज चव्हाण काही म्हणाले असतील. माझी त्यावेळी उपस्थिती नसेल. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही. याशिवाय उपस्थित असले तरी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर सगळ्यांसमोर बोलणं उचित नाही. त्या काळाबद्दल टिप्पणी मला करता येणार नाही. कारण त्यावेळी मी नव्हते. ज्या संघटनेला गोपीनाथ मुंडे यांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्यांनी संघटनेला भरभरून दिलं, त्यानंतर मला असं वाटत नाही की, अशा पद्धतीने त्यांच्या विषयी विचार करण्याची आवश्यकता आहे."

"राजकारणात आजच्या परिस्थितीत अजूनही त्यांचं नाव लोकं घेतात. मग ते कोणत्याही अर्थाने घेत असतील. मी नाही म्हणत की, पृथ्वीराज बाबांनी गोपीनाथ मुंडे यांचं काम अनादराने घेतलं आहे. आदरानेच घेतलं असेल. आता माझ्याविषयीदेखील परवा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टिप्पणी केली. ते देखील अनादर करत नाहीत. मीडिया काय करतो, कुठल्यातरी एका कार्यक्रमाचं स्टेटमेंट काढतो आणि पंकजा मुंडे नाराज आहे, असा प्रश्न विचारतो."असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया थांबवली

'

कराडच्या गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त जिलेबी वाटपातून राष्ट्रप्रेमाचा संदेश ; विविध मान्यवरांची उपस्थिती ; गब्बर ग्रुपचे सर्वत्र होतय कौतुक ;

वेध माझा ऑनलाईन।
सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांच्या माध्यमातून कराडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रप्रेमाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून समूहाने देशभक्तीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

गेल्या अनेक वर्षांपासून गब्बर ग्रुप सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या समूहाने विविध उपक्रमांद्वारे समाजात वेगळा ठसा उमटवला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम हा गब्बर ग्रुपच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे जात, धर्म, पक्ष आणि विचारधारा यापलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याबरोबरच सामाजिक एकोपा वाढविण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जाते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाई आणि जिलेबीचे वाटप करून आनंद सर्वांसोबत वाटण्याची परंपरा गब्बर ग्रुपने अनेक वर्षांपासून कायम ठेवली आहे. या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे, गब्बर ग्रुपच्या कार्यामागे प्रसिद्धीची अपेक्षा नसून सामाजिक बांधिलकीची भावना आहे. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता समाजासाठी सातत्याने काम करण्याची भूमिका या समूहाने स्वीकारली आहे. त्यामुळे गब्बर ग्रुपची ओळख केवळ एका सामाजिक संस्थेपुरती मर्यादित राहिलेली नसून तो कराडच्या सामाजिक अस्मितेचा अविभाज्य भाग बनला आहे.
कोरोनाच्या कठीण काळातही गब्बर ग्रुपने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जेवणाची मदत करण्यात आली. तसेच, आवश्यक वस्तूंचे वाटप करून संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात आले. संकटकाळात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या समूहाने सातत्याने जपली आहे.याशिवाय, आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठीही गब्बर ग्रुपने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही या समूहाच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचा वारसा जपत कराडच्या मातीमध्ये रुजलेला हा समूह आज एका भक्कम वटवृक्षाप्रमाणे समाजाला आधार देत आहे.समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या या समूहाच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
वेध माझा ऑनलाइन।
सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांच्या माध्यमातून कराडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणारा गब्बर ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे कार्यरत आहे. राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या समूहाने विविध उपक्रमांद्वारे समाजात वेगळा ठसा उमटवला आहे.आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने राष्ट्रप्रेमाप्रति आपली बांधीलकी जपत या ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिलेबी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या देशभक्तीचे दर्शन दिले आहे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते

दरवर्षी १५ ऑगस्टनिमित्त गब्बर ग्रुपच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. जात, धर्म, पक्ष आणि विचारधारा यापलीकडे जाऊन युवकांसह समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम या उपक्रमातून केले जाते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मिठाई आणि जिलेबीचे वाटप करून आनंद सर्वांसोबत वाटण्याची परंपरा अनेक वर्षांपासून कायम ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गब्बर ग्रुपची ओळख मर्यादित राहिलेली नसून, तो कराडच्या सामाजिक अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

कोरोनाच्या काळातही गब्बर ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जेवणाची मदत केली. तसेच, आवश्यक वस्तूंचे वाटप करून संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. कठीण परिस्थितीत समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका या समूहाने सातत्याने जपली.आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठीही गब्बर ग्रुपने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून दिली आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडणे, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही या समूहाच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक एकता, राष्ट्रप्रेम आणि माणुसकीचा वारसा जपत कराडच्या मातीमध्ये रुजलेला हा समूह आज एका भक्कम वटवृक्षाप्रमाणे समाजाला आधार देत आहे.आज 15 ऑगस्ट च्या निमित्ताने राष्ट्रप्रेमाप्रति आपली बांधीलकी जपत या ग्रुपच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिलेबी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या देशभक्तीचे दर्शन दिले आहे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते