येथील कोविड योद्धे म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते जयंत बेडेकर,ओंकार आपटे व गणेश पवार यांना येथील समस्त ब्राह्मण विकास सामाजिक संस्थेकडून तीन लाखाचे विमा कवच नुकतेच देण्यात आले आहे.सध्याच्या कोरोना संकटात लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे हे तिघे कराड व परिसरातील कोविड रुग्णापर्यंत पोहोचून त्यांची शक्य ती सेवा करताना दिसत आहेत.जीवाची पर्वा न करता त्यांच्या सुरू असलेल्या या सेवेनिमित्त त्यांना सदर विमा कवच डॉ.अनिरुद्ध दीक्षित,उद्योजक अभिजित चाफेकर,संस्थेचे उपाध्यक्ष विकास देशपांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
जयंत बेडेकर हे नेहमीच सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करताना दिसतात.ते लोकसेवेसाठी 24x7 वेळ देत असतात. गरजूंना औषध सेवा,अत्यावश्यक सेवा,किराणामाल व दुध पुरवण्याबाबतची सेवा देऊन मधल्या लॉक डाऊन काळात त्यांनी अनेकांना आपल्या मदतीचा हात दिला आहे. गरज असणाऱ्या कोरोना पेशंटला ओक्सिजन मशिन उपलब्ध करून देऊन त्या रुग्णाला श्वास देण्याची धडपड करताना सध्या ते दिसत आहेत.
गेले 3 महिन्यापासून जयंत बेडेकरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ओंकार आपटे हे देखील कोविड रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करत आहेत.त्यांनी लॉक डाऊन काळात प्रशासनाची रोजची सेवा करताना विनामूल्य चहा नाश्ता वितरित करून जाहिरातबाजी न करता आपली बांधीलकी जपली आहे.सध्याही त्यांचे कोरोना संकटातील सामाजिक काम अनेक पद्धतीने सुरू आहे.
गणेश पवार हे सामाजिक कार्यकर्ते शहरात धाडसी कोविड योद्धे म्हणून परिचित आहेत.ते स्वतः थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णालाच ऑक्सिजन मशीन लावून त्याचा जीव वाचवण्याची दिवसरात्र धडपड करत आहेत. आत्तापर्यंत 50 हुन अधिक रुग्णांना जीवदान देण्यास ते कारणीभूत ठरले आहेत.त्यांचं हे कार्य अहोरात्र सुरूच आहे.
या तिन्ही कोविड योध्याचे कार्य जीवाची पर्वा न करता सुरू आहे त्याबद्दल त्यांचे शहर व परिसरातून कौतुक होत आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेत येथील समस्त ब्राह्मण विकास सामाजिक संस्थेने त्यांना विमा कवच देऊ केले आहे.
No comments:
Post a Comment