कराड: कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून कोरोनावर मात करण्यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हे अभियान कराड तालुक्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचना माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला केल्या आहेत. याप्रसंगी मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जि प सदस्य निवासराव थोरात, जि प सदस्या सौ मंगला गलांडे, कराड पंचायत समितीचे सभापती रवींद्र ताटे, उपसभापती रमेश देशमुख, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी आदी उपस्थित होते.
राज्यात १५ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या अभियानात कोरोनादूतांनी घरोघरी सर्वेक्षण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य विषयक माहिती संकलित करावी आणि आजारी तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तात्काळ उपचार करावेत असे या मोहिमेचे स्वरूप आहे. ही मोहिम १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत सुरु राहणार आहे, हे अभियान १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० व १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० या २ फेरीमध्ये राबविले जाणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
यापुढे आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, संपूर्ण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. कराड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. हे अभियान फक्त प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असे आवाहन आ पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment