कराड
कराड पालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक व सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसह त्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी कराड पालिकेच्या सभागृहात सुरू केलेले आमरण उपोषण आज (गुरुवारी) प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले.
कराड पालिकेचे अंदाजपत्रक उपसूचनेद्वारे मंजूर केले आहे. ही वस्तुस्थिती डावलून नगराध्यक्षांनी अंदाजपत्रकाची सुचना एकमताने मंजूर झाल्याची खोटी माहिती आणि त्याची खोटी कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली.बहुमताने उपसूचना मंजूर झाली आहे असा अहवाल मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनीही दिला तरीही नगराध्यक्षांनी अंदाजपत्रक व त्याची कागदपत्रे एकमताने मंजूर आहेत अशी खोटी माहिती पुन्हा दुसर्यांदा जिल्हाधिकार्यांना दिली. अशाप्रकारे नगराध्यक्षानी दिशाभूल केल्याने चार महिन्यापासून अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. नगराध्यक्षांचा खोटारडेपणा व मनमानी कारभारच त्याला कारणीभूत आहे. अंदाजपत्रकाची खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक व सभागृहाची दिशाभूल केली आहे असे म्हणत नगराध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करून जनशक्ती आघाडीच्यावतीने आज कराड पालिकेच्या सभागृहात उपोषण करण्यात आले होते.
दरम्यान पुन्हा फेर अर्थसंकल्प सादर करीत असताना सभागृहातील बहुमताचा आदर करीत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 9 जुलैपर्यंत अर्थसंकल्प मंजूर करण्यात येईल असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिल्यानंतर गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते आज स्थगित केले.
या उपोषणास कामगार संघटनांसह विविध ठेकेदारांनी पाठिंबा दिला होता. या उपोषणास बांधकाम सभापती हणमंतराव पवार,आरोग्य सभापती विजय वाटेगांवकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान,नियोजन व विकास सभापती सुप्रिया खराडे, नगरसेविका प्रियांका यादव ,नगरसेवक, बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे , निशांत ढेकळे आदी नगरसेवक उपोषणास बसले होते.
No comments:
Post a Comment