Tuesday, July 20, 2021

आज आषाढी निमित्त डॉ तेजस्वी सौरभ पाटील यांनी उलगडला "माझे माहेर पंढरी' चा भक्तीपूर्ण प्रवास...

कराड
येथील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांचा राजकारणासह इतर विषयातील माहितीपूर्ण अभ्यास त्यांच्याशी बोलले की लगेच समजतो...हातच्या काकणाला आरशाची गरज नसते याची प्रचिती त्यांच्याशी बोलताना येते...वेगळे सिद्ध करायची गरज नसते...त्यांच्या सुविद्य पत्नी तेजस्वी सौरभ पाटील या डॉक्टर आहेत...लसीकरण मोहिमेमध्ये पतीच्या खांद्याला खांदा देत त्यानी सुरुवातिपासून आपले डॉक्टर म्हणून कर्तव्य लीलया पार पाडल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे...कर्तव्याबरोबरच आपल्या अध्यात्मिक संस्कारांना देखील त्यांनी उत्कट भक्तीसह जपल्याचे जाणवते हे त्यांच्या विठ्ठल भक्तीतून... त्यांचे माहेर पंढरी... अवघ्या विश्वाची माऊली  सावली बनून त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे याचा साक्षातकार त्यांचे भक्तीपूर्ण शब्द वाचून होतो...आणि,आज आषाढी...  सौ तेजस्वी पाटील या परमेश्वरी अधिष्ठानाला आपलेसे करणारे शब्द लिहुन जेव्हा आपल्या "माहेर पंढरी' च्या आठवणी सांगू लागतात तेव्हा "पंढरीच जणू अवतरली' असा अनुभव येतो.  

 सौ तेजस्वी सौरभ पाटील यांच्या "आषाढी' आठवणी त्यांच्याच शब्दात...त्यांनी लिहिलेलं जसे च्या तसे...

वारी_एक_अनूभव
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी!
बाप आणि आई,
माझी विठ्ठल रखुमाई!!
संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला अभंग मला खूप जवळचा वाटतो. त्याला कारण देखील तसेच आहे. माझे माहेर पंढरपूर आहे... त्यामुळे विठ्ठल, रुक्मिणी, वारी, वारकरी, संत परंपरा हे सर्व माझ्या माहेरचे असल्याने मी थोडा जास्त अधिकार वाणीने यावर बोलू शकते...
  
माझे आजोबा श्री आनंदराव जगताप, आम्ही तात्या म्हणायचो त्यांना, हे निस्सीम विठ्ठल भक्त... दररोज पहाटे चार वाजता उठून हरिपाठ म्हणत...  अंघोळ झाली कि ज्ञानेश्वरी वाचन हा नित्यक्रम... त्यानंतर आजी सोबत विठ्ठल दर्शनाला मंदिरात जात असत... घराबाहेर अंगणामध्ये पांढरा केशरी पारिजातकाचा सडा पडलेला... आजी जाताना आवर्जून देवासाठी फुले घेऊन जायची... 
   आषाढी वारी हा तर सर्व वैष्णवांचा हजारो वर्षांपासूनचा ठरलेला मेळा... देहू आळंदी मधून ज्ञानोबा तुकोबा रायांच्या पालख्या निघाल्या कि इकडे आम्हाला वेध लागायचे... एकादशी चे....
   घरी भलं मोठं अंगण... तात्यांनी साधारण शंभर वारकरी थांबू शकतील अशी सोय केलेली होती... अनेक वयस्कर वारकरी दहा पंधरा दिवस आधी यायचे... सोबत कोरडा शिधा आणलेला असायचा.... तात्या त्यांना चूल, जळण, तेल मीठ, चटणी लागेल ती सामग्री द्यायचे... 
ज्या प्रमाणे नदीला पूर येताना पाण्याची पातळी हळू हळू वाढते तशीच काहीशी सुरुवात सुरूवात असायची... जस जसा एकादशीचा दिवस जवळ येतो तस तसा भक्तीचा आणी भक्तांचा महापूर पंढरपुरात उसळतो.. 
   अंगणामध्ये सतत अभंग, भजन, कीर्तन सुरू असायचे... चार वाजता प्रवचन तर रात्री नऊ वाजता जेवणानंतर  कीर्तन आणी हरिनामाचा गजर असे... आजही ते खणाणणारे टाळ, चिपळ्या, मृदंग, साथ देणारी वीणा कानामध्ये तसाच नाद करत आहे... आणि नंतर यायचा विठोबा रखुमाई चा जयघोष... 
     आषाढी यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा... मग यात छोटे मोठे  झोपाळे, खेळण्यांची पाले, रंगीबेरंगी लाईट्स, मेव्याची दुकाने बहरात येतात... आम्हाला शाळांना पण सुट्टया असायच्या... आमच्या बच्चे कंपनीला तर तिकडची ओढ लागलेली... तात्या खेळणी आणायला प्रत्येकाला पैसे द्यायचे आम्ही जातानाचा यात्रेत काय काय घ्यायचं, काय काय करायचं यावर चर्चा करत करत घराबाहेर पडून त्या गर्दीचा भाग होऊन जायचो...
   कधी कधी कीर्तनाच्या आधी भारूड असतं... ते आम्हा लहानांसाठी विशेष आकर्षण असायचं. आमच वय तर अभंग समजायचं नव्हतं पण भारूड मनोरंजनातून जनजागृती करतं... 
  दशमीला पालख्यांसोबत आलेले अनेक वारकरी बारीला (दर्शनाची रांग) येऊन थांबायचे. मग यायचा तो एकादशीचा दिवस. माझी आई, बाबा, काका, काकी, आत्या, मामा सगळे कुटूंबच हसतमुखाने वारकऱ्यांच्या सेवेत रमलेले असत... आम्हा मुलांना पंगतीत वाढपीचे काम असे... तसा घरच्यांचा आग्रह होता... कारण स्वतः विठ्ठल पंगतीत जेवतो अशी मान्यता आहे... लहानांना पत्रावळ्या, द्रोण,मीठ, लिंबू असे तर मोठ्यानां शाक भात वाढायला मिळत... दशमीच्या पंगतीत डाळीची आमटी(शाक) भात आणि शिरा असा बेत असे एकादशीला फराळ आणि द्वादशीला पुरी भाजी, मसाले भात असा बेत असतो... तासंतास बारीला उभं राहून विठू माऊलीच निर्मळ विश्वव्यापी रूप डोळ्यात साठवून मग वारकरी आमच्या घरी यायचे... समाधान भरून पावलेले ते वारकरी जाताना तात्यांच्या पाया पडून जात आणी तात्या पण दर्शन घेऊन आलेल्या माऊलीच्या पाया पडत...
  साधारणपणे वारकरी हा सर्वसामान्य कुटूंबातील असतो. जाताना एसटी चे टायमिंग बघून ते परतीचे नियोजन करतात. वारकऱ्याचा पाय निघत नसतो ना आम्हाला त्यांना सोडावं वाटतं. दर्शन करून येताना आमच्या साठी मेवा बत्तासे घेऊन येत... काही वारकरी मुक्कामी राहतात. दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. ते सर्व नियोजन आम्हा कुटूंबियांमार्फत केले जाते... संकल्प सोडून महाप्रसाद केला जातो. पोर्णीमेपर्यंत वारकर्यानी पंढरी गजबजलेली राहते. पोर्णीमेला पंढरपूर शेजारील गोपाळपूर येथे आणि घरीही काला होतो. काल्याचे कीर्तन होते... काला म्हणजे सर्व विठ्ठलभक्त एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णाच्या गवळणी गातात, अभंग कीर्तने होतात. एकत्र येऊन जेवण करतात. मग पंढरी रिकामी व्हायला सुरुवात होते...
  यावर्षी देखील मात्र ना वारी आली ना वारकरी ना यात्रा भरली ना दुकाने सजली. पण माझा पांडुरंग, माझी रखुमाई अठ्ठाविस युगे आम्हा लेकरांची काळजी घेत  पंढरी मध्ये उभे आहेत.  उभे राहतील...

 डाॅ. सौ तेजस्वी सौरभ पाटील.
   कराड.

1 comment:

  1. शब्दरचना खुपच छान वाचून मन एकदम भक्तिमय झालं 😊👍

    ReplyDelete