Saturday, August 22, 2026

जिल्हा बँकेवरून महायुतीत ठिणगी; सामंतांचा गोरे यांना प्रतिइशारा‘आम्ही तुम्हाला का चालत नाही, हे जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजेंना विचारू’; साताऱ्यातील भाजप-शिवसेना वादावर सामंजस्याचा सल्ला ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवू,’ असे स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याबाबतचे संकेत मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी कराडमध्येच त्याला जोरदार प्रतिइशारा दिला.
“आम्ही जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विचारू की, आम्ही तुम्हाला का चालत नाही? महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र नाही जमलं, तर आम्हीही काय गप्प बसणार आहोत का?” असा सवाल करत सामंत यांनी गोरे यांच्या भूमिकेला थेट प्रत्युत्तर दिले.

कराड येथील हॉटेल विट्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप-सेना वाद बाजूला ठेवा; अन्यथा विकासाला फटका
सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षावरही सामंत यांनी भाष्य केले. “सातारा जिल्ह्यातील भाजप-सेना वादाचे राजकारण बाजूला ठेवले, तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत भाजपचे मंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे सांगत, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सामंत यांनी नमूद केले.

धनुष्यबाणाच्या निकालाबाबत सामंत १०० टक्के आशावादी
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावर बोलताना सामंत यांनी बाहेर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर जोरदार टोला लगावला.“सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना बाहेर वेगवेगळे दावे आणि चर्चा सुरू आहेत. अ‍ॅक्टमध्ये काय आहे, याची मला माहिती आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका सुरू असल्याने त्यातील कायदेशीर बाबींवर मी बाहेर भाष्य करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी बाहेरून या प्रकरणावर सातत्याने भाष्य करणाऱ्यांवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. “जे बाहेर बोलतात, ते कदाचित सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल असा खोचक टोला सामंत यांनी लगावला.
धनुष्यबाणाच्या निकालाबाबत आपण १०० टक्के आशावादी असल्याचे सांगत सामंत म्हणाले, “आम्ही काही वावगं केलेलं नाही. आम्ही कोणाचा पक्ष बळकावलेला नाही. आम्ही ज्या पक्षात होतो, त्याच पक्षात असताना झालेल्या घडामोडींची संपूर्ण भूमिका न्यायालयासमोर मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे.”

जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे-पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी उद्या चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच लक्ष्मण हाके हेही आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“दोन समाजांमध्ये कोणत्याही प्रकारची जातीय भिन्नता किंवा तेढ निर्माण होऊ नये, ही सरकारमधील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सामंत यांनी सांगितले.

एकूणच, 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून आलेल्या भूमिकेला शिवसेनेकडून मिळालेल्या या प्रत्युत्तरामुळे सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या राजकारणातील अंतर्गत मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. ‘महायुती म्हणून लढण्याची इच्छा; पण नाही जमले तर आम्हीही गप्प बसणार नाही,’ या सामंतांच्या वक्तव्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment