Friday, October 30, 2026

कराडचा दुष्काळ निवारण्यासाठी अतुलबाबा सरसावले ; कराडच्या दुष्काळ निवारणासाठी ८ कोटी २७ लाखाची मदत मिळणार! पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १० टक्के पाणीकपात; ऑगस्टपर्यंत पिण्याचे पाणी राखीव ठेवणार – आमदार अतुल भोसले

वेध माझा ऑनलाईन
 तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन शेतीचे नुकसान झालेल्या सुमारे ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या निकषांनुसार ८ कोटी २७ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. 
दुसरीकडे, घटता पाणीसाठा आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कराड व मलकापूरसह संपूर्ण तालुक्यात १० टक्के पाणीकपात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
येत्या ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भागेल एवढा साठा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचे शेतीसाठी नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार अतुल भोसले यांनी दिली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार अतुल भोसले यांनी प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचीr बैठक घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत तालुक्यातील पाणीटंचाई, शेतीचे नुकसान, उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि संभाव्य उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कराड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार भोसले यांनी आभार मानले. दुष्काळी तालुक्यांना शासनाकडून मिळणाऱ्या १२ प्रकारच्या सवलतींचा लाभ आता कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये सुमारे ७ हजार ८०० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नुकसानीच्या अनुषंगाने एनडीआरएफच्या निकषांनुसार ८२७ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment