सभागृहात बहुमत असेल तो सत्ताधारी हा नियम आहे.परंतु विरोधकांनी लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करण्याऐवजी बहुमताचा अनादर करण्याचा पायंडा पाडला आहे. ठेकेदारांना बोलावून टक्केवारी बंद करा असे आम्ही सांगितल्यानंतर विरोधकांची टक्केवारीची दुकानदारी बंद होईल या भीतीपोटी त्यांच्याकडून आमच्यावर बिनबुडाचे आरोप होऊ लागले आहेत. असा घणाघात जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी केला.
कराड नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज (सोमवारी) बोलत होते. यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्मिता हुलवान, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदाताई जाधव,नगरसेवक किरण पाटील, गजेंद्र कांबळे,नगरसेविका सौ.आशा मुळे, सौ.प्रियांका यादव, सौ.अर्चना ढेकळे यांची उपस्थिती होती
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, अर्थसंकल्पात शहराच्या विकासाचे नियोजन केले जाते. हा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडून त्याला अंतिम स्वरूप दिले जाते. स्थायी समितीमध्ये आमचेच बहुमत आहे. परंतु सूचना आणि मागणी करुनही अर्थसंकल्पाची पुस्तिका छापण्यात आली नाही एवढे कारण देऊनही ती दिली नाही. नगराध्यक्षा सांगेल तो सूचना वाचेल असा नवीन पायंडा विरोधकांनी पाडला आहे. नैसर्गिक हक्क सत्ताधाऱ्यांचा असताना विरोधकांनी स्वतःचा गोंधळ करून घेतला आहे. लोकशाहीत बहुमताचा आदर करण्याऐवजी विरोधकांनी बहुमताचा अनादर करण्याचा पायंडा पाडला आहे. अर्थसंकल्पावरून गोंधळ घालण्याचा आणि सभागृहाचे वातावरण दुषित करण्याचा आमचा प्रयत्न नाही, उलट लोकप्रतिनिधींना चुकीची सूचना देऊन चक्क त्यांनी फसवणूक केले आहे. असा आरोप यादव यांनी केला.
अर्थसंकल्पातील महसुली आणि भांडवली असा जमा-खर्चाचा 134 कोटी 79 लाखाची मूळ सूचना आम्ही फेटाळून लावली असून त्यामध्ये उपसूचनेद्वारे महसुली आणि भांडवली असा जमा-खर्चाचा 270 कोटी 99 लाखाची उपसूचना आम्ही बहुमताने मंजूर केला आहे. उपसूचनेद्वारे मंजूर केलेला हा अर्थसंकल्प आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. गेली चार वर्ष आम्ही राजकारण विरहीत काम केले. एकमताने आणि गावाच्या हितासाठी अर्थसंकल्प मंजूर केला परंतु विरोधकांनी त्यांची टक्केवारीची दुकानदारी बंद होईल या भीतीपोटी रडीचा डाव खेळत मापे काढण्याचा उद्योग सुरू केला आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत.अर्थसंकल्पात स्टेडियमची भाडेवाढ करण्याचे ठरले नसताना मग ही भाडेवाढ झाली कशी.ही जबाबदारी आपल्यावर आली की ते प्रशासनावर ढकलून मोकळे होतात. लोकशाही आघाडीने प्रश्न विचारले की मग उत्तर का देत नाहीत. असा आरोप करून करुन राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्षावर थेट टिकास्त्र सोडले. नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली अर्थसंकल्प मांडला जातो हा अर्थसंकल्प आहे की मानपत्र...? हे समजत नव्हते कारण प्रास्ताविकामध्ये नगराध्यक्षांनी स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेतल्याचे दिसत होते. खुर्चीवर बसून इकडची- तिकडची मापे काढण्यात आणि बजेटच्या खालचे आकडे बघून आम्हाला किती टक्केवारी मिळेल? याकडे त्यांचे लक्ष असते. पाण्याच्या नळावर जशी भांडणे असतात अशा पद्धतीचे वागणे नगराध्यक्षाकडून दिसून येत आहे.हे बरोबर नाही. नगराध्यक्षा त्यांच्या गृहपाठात नापास झाल्या असल्याचा आरोप यावेळी यादव यांनी केला.
नगरपालिकेसाठी खारीचा वाटा उचलणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु फारूक पटवेकर यांनी निधीसाठी कुणाकडेही पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.मग तुम्ही काय सभागृहात खुर्च्या झिजवायला येतात का ? असा आरोप करून राजेंद्रसिंह यादव यांनी फारुख पटवेकर यांच्यावर टीका केली. कावीळ झालेल्या माणसाला जसे जग पिवळे दिसते तसे कशी अवस्था विनायक पावसकर यांची झाली आहे. बिनबुडाचे आरोप करून दिशाभूल करणे एवढाच त्यांचा उद्योग आहे. मागील स्थायी समितीमध्ये जाता आले नाही हा राग मनात धरून त्यांनी पाठित खंजीर खुपसण्याचे काम सुरू केले आहे.
विरोधकांकडून ठेकेदारांना बोलावून टक्केवारी घेतली जाते तसेच दमदाटी केली जाते. परंतु आम्ही टक्केवारी मोडीत काढणार आहोत. कोणत्याही ठेकेदाराला यापुढे दमदाटी, त्रास दिला गेला तर त्यांची आम्ही गय करणार नाही. ठेकेदारांनी यापुढे आमच्याकडे तक्रार घेऊन यावी त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
No comments:
Post a Comment