Thursday, July 21, 2022

आदित्य ठाकरे यांची सकाळी शिवसैनिकांसमोर सभा , त्याच ठिकाणचे शिवसैनिक संध्याकाळी शिंदे गटात सामील

वेध माझा ऑनलाइन - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही सक्रीय झाले आहेत. मुंबईत काढलेल्या निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे युवासैनिकांशी शिवसंवादच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सकाळी ज्या ठिकाणी सभा घेतली, त्याच ठिकाणच्या शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment