Sunday, July 31, 2022

ईडी च्या छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली... यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव ;

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सगळ्याशी एकनाथ शिंदेंचा काय सम्बन्ध ? असा मुद्दा आता पुढे आला आहे

१० लाखांच्या रकमेवर शिंदेंचं नाव
संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्यावर सकाळी सातच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी अधिकारी दाखल झाले. सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते. शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही येथेही ‘ईडी’कडून शोधमोहीम राबवण्यात आली. नऊ तास सुरु असणाऱ्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली. यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असून ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.
दरम्यान,या रक्कमेवर एकनाथ शिंदे यांचं नाव समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊतांच्या घरात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांच्या नावाने 10 लाखांची रोकड का ठेवण्यात आली होती, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment