Saturday, July 9, 2022

गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट ; अकरापैकी दहा आमदार भाजपात विलीन होण्याच्या तयारीत ; गोव्यात होणार राजकीय भूकम्प...

वेध माझा ऑनलाइन - 
गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून अकरापैकी दहा आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप श्रेष्ठींकडून या विलिनीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून आज सायंकाळपर्यंत दहा आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवार ११ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणाऱ्या हालचाली विरोधी काँग्रेसची आमदारांमध्ये गतिमान झाल्या आहेत. शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव तातडीने दाखल झाले. त्यांनी आमदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्ष नेते मायकल लोबो तसेच अन्य नऊ काँग्रेसचे आमदार मिळून एकूण दहा जण काँग्रेस विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती मिळत आहे
मिळालेल्या  माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून विलीनीकरणास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत हे आमदार भाजप प्रवेश करतील. गोवा विधानसभेत सध्या काँग्रेसचे अकरा आमदार आहेत. सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस वगळता काँग्रेसचे दहा आमदार प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. पक्षांतर बंदी कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश आमदार फुटीची आवश्यकता आहे. आठ आमदार पुरेसे होते, परंतु येथे ११ पैकी १० आमदार भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत.

No comments:

Post a Comment