वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत येताच महाविकास आघाडीला एकामागेएक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताच गेल्या सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमधील सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर त्यातील काही निर्णय पुन्हा एकदा घेतले. यामागे त्यांनी कायदेशीर बाबींचं कारण दिलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार काळात अर्थ विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीला स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जातोय. कारण अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यांनीच संबंधित निधी मंजूर केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना झटका देणारा मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना नगर विकास विभागातून मंजूर केलेल्या 941 कोटींच्या निधीला एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांनी स्थगित केलेल्या 941 कोटींच्या निधीपैकी सर्वाधिक निधी हा अजित पवार यांच्या बारामती नगरपरिषदेसाठी देण्यात आलेला होता.
No comments:
Post a Comment