वेध माझा ऑनलाइन - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना ही आता थेट घरातूनच फुटताना दिसत आहे. कारण ठाकरे घराण्याचे वंशज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील मुख्य शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. निहार ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. विशेष म्हणजे निहार हे लवकरच अधिकृत पाठिंबा जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले दिवंगत चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत.
"मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि आम्ही चर्चा केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदे नक्कीच पुढे घेवून जातील. त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. माझी स्वत:ची लॉ फर्म आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना जी काही लीगल मदत लागेल ती मी देईन", अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment