Thursday, February 17, 2022

गुजरात बॉम्बस्फोट प्रकरण ; 38 जणांना फाशीची शिक्षा...

वेध माझा ऑनलाइन - गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात एकूण 49 दोषी होते त्यापैकी 38 जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 

ही साखळी बॉम्बस्फोटाची घटना 26 जुलै 2008 रोजी घडली होती. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल 21 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात 56 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये 20 तर सुरतमध्ये 15 गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

यानंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकानं अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

No comments:

Post a Comment