Saturday, February 12, 2022

कराड दक्षिणमधील सोसायटी निवडणुकीत भोसले गटाचे वर्चस्व ; वाठार येथे सत्तांतर; तर बेलवडे बुद्रुक व आणे येथे विजयी परंपरा कायम

वेध माझा ऑनलाइन ;  कराड दक्षिण मतदारसंघातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटींच्या निवडणुकीमध्ये य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रणित पॅनेलनी वर्चस्व राखले आहे. वाठार (ता. कराड) येथे भोसले गटाने सत्तांतर घडवित विरोधकांना धूळ चारली आहे. तर बेलवडे बुद्रुक व आणे येथे सत्ता पुन्हा अबाधित राखत आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.

कराड दक्षिणमध्ये वाठार, बेलवडे बुद्रुक व आणे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटींची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भोसले गटासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळाकर, अविनाश मोहिते, इंद्रजीत मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांच्या समर्थकांनी चुरशीने सहभाग घेतल्याने, या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागू राहिले होते.
वाठार विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भोसले प्रणित श्री म्हसोबा परिवर्तन शेतकरी पॅनेलने १३ पैकी १० जागांवर विजय प्राप्त करुन सत्तांतर घडवून आणले.  या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळाकर, अविनाश मोहिते, इंद्रजीत मोहिते, राजेश पाटील-वाठारकर समर्थक सत्ताधारी श्री म्हसोबा शेतकरी पॅनेलला केवळ ३ जागांवरच विजय मिळविता आल्याने, पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भोसले गटाचे चंद्रकांत देसाई, प्रकाश पाटील, प्रमोद अधिकराव पाटील, प्रमोद मोहन पाटील, संभाजी पाटील, सुनील पाटील, रत्नाबाई पाटील, जगन्नाथ अडसुळे, अर्जुन कुंभार, रामचंद्र मलगौंडी विजयी झाले. 

अत्यंत चुरशीने झालेल्या बेलवडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीतही भोसले समर्थक सत्ताधारी शेतकरी सभासद सेवा सहकारी पॅनेलने १३ पैकी १० जागांवर विजय संपादन करत, आपली विजयी परंपरा कायम राखली; तर विरोधकांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. याठिकाणी गजानन मोहिते, जयकर मोहिते, जयवंत आनंदराव मोहिते, जयवंत यशवंत मोहिते, दादासो मोहिते, प्रकाश मोहिते, चैत्राली मोहिते, जयसिंग वडार, झाकीर मुल्ला, खलिफ वाघमारे यांनी विजय संपादन केला. या यशासाठी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक ॲड. जयवंतराव मोहिते, हर्षवर्धन मोहिते, पै. जगन्नाथ मोहिते, डॉ. संपतराव मोहिते, डॉ. सुशांत मोहिते, जयवंत पांडुरग मोहिते, प्रदीपकुमार मोहिते आदींनी परिश्रम घेतले.

आणे विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीतही भोसले समर्थक ज्योतिर्लिंग सहकार पॅनेलने सर्वच जागांवर विजय संपादन करत आपली सत्ता अबाधित ठेवत, याठिकाणी भोसले समर्थक पॅनेलचे सदाशिव चव्हाण, आत्माराम देसाई, कालिदास देसाई, बाळासो देसाई, विश्वास देसाई, सुरेश देसाई, रमेश पाटील, सुभाष पाटील, सुरेखा देसाई, सुनिता पाटील, मजरंग सुतार, बाळकृष्ण कांबळे यांनी विजय प्राप्त केला. या सर्व विजयी उमेदवारांचे आणि पॅनेलप्रमुख नेत्यांचे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment