वेध माझा ऑनलाइन - प्राचीन शिल्पकलेतील अजोड कलाकृती म्हणून लौकिक असलेली येथील ग्रामदेवता श्री उत्तरालक्ष्मीची मूर्ती सर्वसामान्यांसह इतिहासकारांच्या जिव्हाळय़ाची आहे. कराडच्या सोमवार पेठेत स्थित असलेल्या या देवीचा इतिहास बाराव्या, तेराव्या शतकापासून आहे. या संस्थानचे नव्याने संशोधन सुरू झाले असून इतिहासातील अनेक संदर्भ प्रकाशात येणार आहेत.
सातारा जिल्हय़ातील शिरवळचे मोडी लिपी अभ्यासक व संशोधक महेश्वर चव्हाण व मंदिराचे पुजारी चंद्रहास पुजारी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुजारी यांच्या वाडवडिलांनी जतन केलेल्या जुन्या कागदपत्रांचे संशोधन महेश्वर चव्हाण यांनी सुरू केले आहे. यात अतिशय महत्वाची माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे सोळाव्या शतकात परकीय आक्रमणावेळी ही अजोड मूर्ती पुजारी यांच्या वंशजांनी मोठय़ा धाडसाने घरात लपवून ठेवली होती. ती कृष्णाकाठी जमिनीत सापडली नव्हती, असा इतिहास नव्याने समोर आलाय.
सोमवार पेठेतील भैरोबा गल्लीत श्री उत्तरालक्ष्मीचे मंदिर आहे. या प्राचीन मूर्तीची ख्याती लक्षात घेऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर यांच्यासह संशोधकांनी मंदिराला भेटी दिल्या आहेत.
मोडी लिपीचे अभ्यासक महेश्वर चव्हाण यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कराडमधील संशोधक के. डी. देशपांडे यांच्या लिखाणातून या देवीची माहिती मिळाली होती. त्यातून त्यांची जिज्ञासा वाढत गेली. दरम्यान, इस्लामपूरला परीक्षेसाठी आल्यानंतर त्यांनी उत्तरालक्ष्मी मंदिरला भेट दिली. पुजारी चंद्रहास पुजारी यांच्याशी चर्चा केली. महेश्वर हे मोडी लिपीचे अभ्यासक असल्याचे समजताच त्यांनी वाडवडिलांच्या काळापासून जतन करून ठेवलेली मोडीतील मध्ययुगीन कागदपत्रे त्यांना दिली. महेश्वर यांनी या कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. ही कागदपत्रे अतिशय जीर्ण होती. मात्र मोठय़ा कौशल्याने त्यांनी संशोधन केले. यातून श्री उत्तरालक्ष्मी संस्थानबद्दलच्या नव्या माहितीवर प्रकाश पडत गेला. गेले 5 महिने ते संशोधन करत आहेत.
या संशोधनातून ही मूर्ती पुजारी यांच्या वंशजांनी 1736 सालापूर्वी झालेल्या परकीय आक्रमणावेळी हे देवालय विछिन्न होत असताना मोठय़ा धाडसाने घरात लपवली होती. धामधुमीचा काळ असतानाही स्वगृही प्रतिष्ठापना करून नित्यसेवा केली. या देवीची मोठी महती असल्याने गावकऱयांनी वर्गणी जमवून देवीचे नवीन मंदिर बांधले, अशी हकीकत सांगणारे 1736 सालचे औंध पंतप्रतिनिधींचे पत्र उपलब्ध झाले आहे. यापूर्वी 17 व्या शतकातील परकीय आक्रमणावेळी ही मूर्ती तळय़ाकाठी, नदीकाठी वाळवंटात लपवली होती. नंतर ती जमीन नांगरताना फाळाला लागली. त्यावेळी तिची प्रतिष्ठापना भैरोबा गल्लीत करण्यात आली, अशी आख्यायिका लोकस्मृतिनुसार प्रचलित होती. मात्र गेल्या दहा पिढय़ा या देवीची सेवा करणाऱया पुजारी कुटुंबातील वंशजांनी मूर्ती धाडसाने लपवून नित्यसेवा केल्याचा नवा इतिहास पुढे आला आहे. या देवीच्या संस्थानची नवी कागदपत्रे समोर आली असून महेश्वर चव्हाण यांनी याबाबतचा शोधनिबंध भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे सादर केला असून त्याचे वाचनही झाले आहे.
महेश्वर चव्हाण हे मोडी लिपीचे अभ्यासक आहेत. 2017 साली त्यांनी मोडीचा अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे जिज्ञासेपोटी त्यांनी श्री उत्तरालक्ष्मीच्या कागदपत्रांचा अभ्यास केला. 2021 मध्ये यांनी आपला संशोधनाचा पहिला शोधनिबंध भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांना सादर केला आहे.
आणखी इतिहास पुढे येईल...
मी मोठय़ा जिज्ञासेने या संस्थानच्या संशोधनासाठी पुढाकार घेतला. मंदिराचे पुजारी चंद्रहास पुजारी यांनी मला जुनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली. अजूनही बरीच कागदपत्रे अभ्यासणार आहे. यातून जुन्या काळातील या महत्वाच्या संस्थानचा इतिहास पुढे येणार आहे. या कार्यामध्ये गुरुवर्य, दुर्गप्रेमी के. एन.देसाई, का. धों. देशपांडे, सहकारी मित्र तेजस अरबुणे, किरण माळी, संकेत फडके, किरण जाधव, जयेश मोरे, वैष्णवी सुर्वे या सर्वांसह पुजारी कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
-महेश्वर चव्हाण, मोडी अभ्यासक
नव्या पिढीसमोर उत्तरालक्ष्मीची महती येतेय, याचे समाधान...
आमच्या दहा पिढय़ांनी या देवीची मनोभावे सेवा केली. देवीचा आमच्यावर सतत कृपाशिर्वाद राहिला. आता नव्याने आमच्याकडील कागदपत्रांचा अभ्यास महेश्वरसारखी नवी पिढी करतेय आणि या देवीची महती नव्या पिढीसमोर येतेय, याचे समाधान वाटते.
-चंद्रहास पुजारी, कराड
नव्याने समोर आलेला इतिहास
1829 सालच्या पत्रात देवीच्या उत्सवाच्या नोंदी
आदिलशाही काळात संस्थानचा जागृत देवस्थान म्हणून उल्लेख
रोजचा नैवेद्य, नंदादीपसाठी साडे पंधरा रूपये लावून दिल्याचे व विडय़ाची पाने सुमारे 25 व सुपारी 3 टका याप्रमाणे लावून दिल्याची नोंद
1697 मधील शंकराचार्य पंडितराव यांच्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख
देवीकार्यात लबाडी करणाऱया मोकादमास खडसावणारे पत्र
देवीचे वार्षिक उत्सव, त्याचा खर्च, उत्सवाचे स्वरूप याची माहिती उजेडात
No comments:
Post a Comment