Friday, February 25, 2022

कराड नगरपालिकेच्या अधिकार्‍यास धक्काबुक्की प्रकरणी दोघांना अटक; चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी...

वेध माझा ऑनलाइन -   नगरपालिकेचे नगर रचनाकार रोहन ढोणे माहिती अधिकारातील माहिती व्यवस्थित देत नसल्याच्या कारणावरून दोघांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर संबंधित दोघांवर शासकीय कामात अडथळा आणला यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी नगरपालिकेतील नगर रचनाकार रोहन ढोणे यांना शहरातील धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. संबंधितास कारण देऊन माहिती देता येत नसल्याचे पत्र माहिती मागणाऱ्याला घरी पाठवले होते. त्यावेळी ते पत्र पाहून संबंधित धैर्यशील कराळे याने ढोणे यांना अर्वाच्च भाषेत फोनवरून शिवीगाळ केली.  त्यानंतर ढोणे कार्यालयातील काम आटोपून घरी चालले असता सायंकाळी सातच्या सुमारास धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी ढोणे यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबतची माहिती पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळताच ढोणे यांच्यासह सर्वजण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांचा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जमावाला शांत करून योग्य ती रिसल्ट कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित होते.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांना शुक्रवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.  नगरपालिका नगररचना विभागातील सहायक अधिकारी रोहण ढोणे यांना झालेल्या मारहाणीचे आज नगरपालिकेत तीव्र पडसाद उमटले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सदर घटनेचा निषेध केला. यापुढे असा प्रकार झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पाणी पुरवठा अभियंता ए. आर. पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे, अकाऊंट प्रमुख कमलेश रविढोणे, प्रशांत कांबळे, दत्तात्रय तारळेकर, उमेश महादर, माणिक बनकर, अशोक पवार, दिनेश पेडणेकर, श्रीकांत भोसले यांच्यासह सर्व कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाले.


No comments:

Post a Comment