वेध माझा ऑनलाइन - शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतरपासून नितेश राणे पोलीस कोठडीत आहेत. विशेष म्हणजे संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांची आज जवळपास सलग चार तास चौकशी झाली. पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या स्वीय साहाय्यक राकेश परबची समोरासमोर बसून चौकशी केली. नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले. याप्रकरणी पुरावे जमा करण्याची आणि खातरजमा करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे.
नितेश राणेंची दोन टप्प्यात चौकशी
नितेश राणे यांची दोन टप्प्यांमध्ये चौकशी झाली. आधी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. राकेश परबच्या मोबाईलमधून या प्रकरणातील गुन्हेगारांवर कितीवेळा फोन केला गेला याबाबत चौकशी केली गेली. या चौकशी दरम्यान कणकवली पोलीस राकेश परबला घेऊन कुठेतरी दुसरीकडे घेऊन गेले होते. त्यानंतर थोड्या वेळाने त्याला पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्याची पुन्हा चौकशी केली गेली, अशी दोन टप्प्यात नितेश राणे आणि राकेश परब यांच्यात चौकशी केली गेली. चार तासांपैकी दोन तास नितेश राणे यांची एकांतात वैयक्तिक चौकशी केली गेली.
नितेश राणेंना घेऊन पोलीस गोव्यात दाखल
नितेश राणेंची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस राणेंना घेऊन आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गोव्याच्या दिशेला निघाले. गोव्यातील काही ठिकाणी नितेश राणे राहिले होते. विशेषत: ज्यावेळी पोलीस नितेश राणेंना शोधत होते त्यावेळी ते गोव्यात काही ठिकाणी राहिले होते. त्याचबरोबर हल्ल्याच्याआधी गोव्यात मिटिंग झाली होती, असा सुगावा कणकवली पोलिसांना लागलेला आहे. त्यासाठीच कणकवली पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी हल्ल्याचा कट रचला गेला तिथे काही पुरावे मिळतात का याचा प्रयत्न पोलीस घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार नितेश राणे यांना घेवून कणकवली पोलीस गोव्यातील कलंगूट बीचवरील नीलम हॉटेलवर पोहोचले आहेत.
पोलिसांचा नेमका दावा काय?
या प्रकरणात पोलिसांचा तपास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणात काही जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पुण्याचा सचिन सातपुते हा मुख्य आरोपी आहे. राकेश परब हा नितेश राणेंचा पीए आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी स्वत:च्या मोबाईलद्वारे नाही तर राकेश परबच्या मोबाईलद्वारे सचिन सातपुते सोबत बातचित केली, असा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे ही बातचित एक-दोनदा नाही तर तब्बल 38 वेळा झाल्याचा अंदाज आहे.
No comments:
Post a Comment