वेध माझा ऑनलाइन - समस्त भूतलावरील श्रोत्यांना अमृतवाणीची अनुभूती देणाऱ्या अशा दैवी चेहऱ्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रभूकुंज ते शिवाजी पार्क रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी... अलोट जनसागर...कला, क्रिडा अन् राजकीय क्षेत्रासह अनेक दिग्गजांची उपस्थिती... अन् साश्रूपूर्ण नयनांनी 'लता मंगेशकर अमर रहे'च्या घोषणा, अशा वातावरणात भारतरत्न लता मंगेशकर यांना अंतिम निरोप देण्यात आला. संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि देशाचा अमृत आवाज अनंतात विलीन झाला. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मंगेशकर कुटुंबीयांसह उपस्थित जनसमुदायासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लता दीदींनी आज इहलोकातून देहरुपी निरोप घेतला असला तरी त्या दैवी स्वरांतून नेहमीच सर्वांच्या मनात कामय राहतील.
गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी आठ वाजून १२ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. लता दीदींच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण देश शोकाकुल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, नितीन गडकरी, शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज आपले नियोजित कार्यक्रम रद्द करुन मुंबईकडे प्रस्थान केलं आणि शिवाजी पार्कमध्ये पोहोचून लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह शाहरुख खान, जावेद अख्तर, सचिन तेंडुलकर, कैलाश खेर, आमीर खान, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment