वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याहून आता मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. गोव्याच्या ताज हॉटेलमधून आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्यांची बस विमानतळाच्या दिशेला रवाना झाली होती. त्यानंतर ते विमानतळात दाखल झाले. या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत. सर्व आमदार विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते विमानात बसले आणि मुंबईच्या दिशेला रवाना झाले. पुढच्या दोन तासात हे सर्व आमदार मुंबईत दाखल होतील. या आमदारांच्या विमानात बसतानाचा पहिला व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत आमदार विमानात आसनस्थ होताना दिसत आहेत.
शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार विधान परिषदच्या 10 जागांच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी रात्री म्हणजे 20 जूनला रात्री मुंबईहून गुजरातच्या दिशेला रवाना झाले होते. त्यानंतर ते तिथून गुवाहाटीला गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 11 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असे फेरबदल झाले. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या शिवसैनिक आमदारांमुळेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं भाजपला पाठिंबा मिळाल्याने भाजप आणखी सक्षम झाली आहे. या सर्व घडामोडींनंतर अखेर 11 दिवसांनी शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार आज मुंबईत दाखल होत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने मुंबईत आणलं जात आहे.
No comments:
Post a Comment