राजेंद्रसिंह यादव व शरद कणसे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरासाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी दिला. एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांचे हात बळकट करा. शिवसेनेच्या बळकटीसाठी कराडमध्ये राजेंद्रसिंह यादव यांना पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकद देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
राजेंद्रसिंह यादव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या भुयारी गटर योजना, पाणी पुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी सुमारे २०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांचे ऑनलाइन भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव, शहर प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, हणमंत पवार, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक व महिलांची प्रचंड उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडच्या महत्त्वपूर्ण योजनांचे भूमिपूजन होणार होते. परंतु ते पोहचू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी कराडच नव्हे तर संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रचंड निधी दिला आहे. अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
कराडसाठी लवकरच ड्रीम प्रोजेक्ट - यादव
राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, स्मार्ट कराडचे स्वप्न पाहून त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागणीचा विचार करून २०९ कोटींचा निधी दिला. आजपर्यंत एकावेळी इतका निधी शहराला मिळाला नव्हता. कराड फेज टू ची ही सुरुवात आहे. आणखी निधी येत राहिल. कराड शहर व तालुक्याला दिशा देईल, असा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला असून लवकरच त्याची घोषणा करणार आहे. फेज टू मध्ये शहर आदर्शवत करणार असून शहर पाहण्यासाठी राज्यातून लोक येतील, अशा पद्धतीने कामांची आखणी करणार आहे.
कराडच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्क प्रमुख शरद कणसे यांचे सहकार्य लाभले आहे. या विकास कामांचे लोकार्पण भव्य प्रमाणात करणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहर व परिसरात ५१ शाखांचे उद्घाटन त्यावेळी करणार असल्याचे यादव यांनी सांगितले. कराडमधील विकास कामे शहराच्या इतिहासात मैलाचा दगड ठरतील.
शरद कणसे म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे विकासाची दृष्टी असून भविष्यात शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.
जयवंतराव शेलार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कराड साठी कधी नव्हे इतका निधी मिळाला आहे. या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम यादवांनी केले आहे.
प्रास्ताविकात स्मिता हुलवान म्हणाल्या की, कराडच्या विकासाची दृष्टी राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे आहे. भविष्यात स्मार्ट कराडचे स्वप्न साकार करण्यासाठी यादव यांच्या पाठीशी राहावे. राजेंद्रसिंह यादव यांचे नेतृत्व भविष्यात वाढत जावे, यादृष्टीने त्यांनी भविष्याचा वेध घ्यावा. स्मार्ट कराडचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे.
राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे मोठी जबाबदारी द्या ;
सचिन पाटील यांनी मित्र परिवाराच्या वतीने मनोगत व्यक्त करताना राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी द्यावी. आम्ही सर्व ताकदीने यादव यांच्याबरोबर राहणार आहोत, अशी मागणी यावेळी केली. मोठ्या पदावर नसतानाही यादव यांनी विक्रमी निधी कराडसाठी खेचून आणल्याने आगामी काळात यादव यांच्याकडे पक्षाकडून मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा मेळाव्यात सुरू होती.
No comments:
Post a Comment