वेध माझा ऑनलाइन।
महायुतीतील भाजप आणि मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेनं नुकतीच आपली पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. त्यांच्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची ३८ उमेदवारांची देखील पहिली यादी जाहीर झाली. सातारा जिल्ह्यातील फक्त वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा यादीत समावेश आहे. काही दिवसांपूर्वी फलटणमधून उमेदवारी घोषित केलेल्या दीपक चव्हाण यांनी साथ सोडल्यानंतर येथील जागेला उमेदवारच उरला नसल्याने ती जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून चाचपणी सुरु असली तरी ‘उत्तर’ मात्र सापडेनासे झाले आहे.
कराड उत्तर या मतदारसंघात कायम जोरदार लढतीची चर्चा असते. पण ऐनवेळी ती विरून जाते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदार संघ तसा पहिला तर महायुतीत अजितदादा पवार गटाकडे जायला हवा. मात्र, या मतदार संघावर भाजप आणि आता शिंदे गट शिवसेनेने डोळा लावून बसल्याने या मतदार संघातील जागा वाटपाचे सूत्र अजूनही सुटलेले नाही. मात्र, सध्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अजितदादा गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. रात्रीच्या बैठका आणि दिवसभरात गटातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा अशा घडामोडी या ठिकाणी घडत आहेत.
No comments:
Post a Comment