सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) व अन्य घटक पक्षांच्या माध्यमातून लढवण्यात येत आहेत. त्यानुसार आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा आदेश दिला असून त्यानुसार महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा यशवंत विकास आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी केली.
कराड दक्षिणमधील महायुतीच्या उमेदवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, राहुल खराडे, सुधीर एकांडे त्यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. यादव म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे समन्वयक म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष, गटतट, पदाधिकारी यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. विधानसभेत महायुतीचे सरकार आल्यावर शहराचा कायापालट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कराड शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माझ्यासह यशवंत विकास आघाडीतील सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी 100 कोटींचा निधी देण्याची ग्वाही दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 209 कोटींचा निधी मिळाला आहे. यावरच न थांबता येणाऱ्या काळात 300 ते 350 कोटींच्या निधीची कामे प्रस्तावित आहेत. त्यापेक्षा आणखी जास्त निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
No comments:
Post a Comment