Sunday, May 10, 2020

जनशक्तीचे नेते राजेंद्रसिह यादव यांच्यावतीने 5000 कुटुंबियांना भाजीपाला वाटप

अजिंक्य गोवेकर
कराड
प्रतिनिधी
जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे यातना भोगणाऱया शहरवासियांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली आहे. आतापर्यंत तीन हजार कुटुंबांना अन्नधान्याची किट त्यांनी दिली. सध्या 100 टक्के लॉकडाऊन असल्याने शहरात भाजीपाल्याची टंचाई आहे. त्यामुळे पाच हजार कुटुंबांना 15 दिवस पुरेल इतका भाजीपाला मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ यादव यांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते केला. अडचणीच्या काळात यादव हे धावून आल्याने गोरगरीब, गरजू लोक त्यांना धन्यवाद देत आहेत.
कोरोना आपत्तीच्या काळात सक्षम योद्धय़ाप्रमाणे राजेंद्रसिंह यादव यांनी समाजासाठी मदतीचा हात दिला आहे. मुळातच त्यांच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यांनी कोरोना महामारीचा अंदाज घेऊन शहरातील गोरगरीब लोकांना महिनाभर पुरेल असे धान्य किट दिले. यासाठी त्यांनी लाखो रूपये खर्च केले होते. मात्र संकट थांबले नाही. ते आणखी गडद होत गेले. कराड परिसरात रूग्ण वाढल्याने हा भाग कंटेनमेंट झोन झाल्यानंतर जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा बंद झाल्या. परिणामी शहरात किराणा आणि भाजीपाला मिळणे कठीण झाले. त्यामुळे दुसऱया टप्प्यात मदतीबद्दल विचार करताना राजेंद्रसिंह यादव यांनी गरजू कुटुंबांना भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते शेतकऱयांच्या बांधावर पोहोचले. तेथे शेतकऱयांशी चर्चा करून भाजीपाल्याची ऑर्डर दिली. त्यानुसार 1 किलो कांदा, 1 टोमॅटो, 1 किलो दुधी, 1 किलो घोसावळे, 1 किलो कोबी, अर्धा किलो कारले, कडीपत्ता, ढब्बू मिरची अशी सुमारे सव्वा दोनशे रूपये किंमत असणारी भाजीची पॅकेट तयार करण्यात आली. ही 5 हजार पॅकेट कराडमध्ये मोफत वाटण्यात येणार आहेत.
राजेंदसिंह यादव यांनी काल प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ केला. गुरूवारी बसस्थानक परिसर, हेड पोस्ट, शनिवार पेठ या परिसरात या भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले.
दिघे यांनी, यादव यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. राजेंद्रसिंह यादव म्हणाले, शहरात गोरगरीब जनतेची कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. सध्या गावात भाजीपाल्याची अडचण असल्याने ती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाजी मोफत घरपोच दिली जाणार आहे. यापुढील काळात अन्नधान्याच्या किटसह कलावंत व दिव्यांगांना मदत दिली जाणार आहे.


मदतीचा होणार दुहेरी फायदा
शहरात भाजीपाल्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे राजेंद्रसिंह यादव यांनी शहरात 5 हजार कुटुंबांना मोफत भाजीपाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरवासियांची सोय होणार आहे. ग्रामीण भागात मागणी नसल्याने भाजीपाला पडून आहे. या शेतमालाचाही उठाव होणार असल्याने शेतकरी वर्गास फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment