Wednesday, May 27, 2020

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लवकरच विधानसभेच्या अध्यक्षपदी होणार विराजमान?

कराड/ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार सुरू असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या स्थितीबाबत काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी हे फारसे समाधानी नाहीत. मुळातच शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील होण्यास राहुल गांधी यांचा सुरुवातीपासूनच ठाम विरोध होता. मात्र तरीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहामुळे आणि महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राहुल गांधी यांनी शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यास नाराजीनेच संमती दिली होती.आता राज्यातील काँग्रेसच्या पुढील राजकारणाचा एक भाग म्हणून आ.पृथ्वीराजबाबा चव्हाण याना विधानसभा अध्यक्ष पदी विराजमान करण्याचा विचार सध्या काँग्रेस अंतर्गत सुरू आहे असे खात्रीलायक वृत्त आहे

काँग्रेस जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी असली तरी राज्य सरकारच्या महत्त्वाच्या मोठ्या निर्णयांमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही, अशी उघड नाराजी काल राहुल गांधी यांनी दिल्लीत व्यक्त केली होती. पक्षीय बलानुसार महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला तिसर्‍या क्रमांकाचे स्थान आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री अधिक सक्रिय असतात. मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच चर्चा होऊन घेतले जातात, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या मंत्र्यांनी राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केला होता. त्यातही काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघाही माजी मुख्यमंत्र्यांमधून विस्तव जात नाही अशी स्थिती आहे तर प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची वाटचाल आणखी तिसर्‍या दिशेने चालू असते अशी नाराजीही ही राज्यातील थोरात विरोधी काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचवली आहे.त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे असेही वृत्त आहे.
 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार नसल्याने काहीसे विजनवासात गेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या अभ्यासू आणि अनुभवी नेत्याचा  काँग्रेसच्या पडत्या काळात  राज्यातील पुढच्या एकूणच सर्व राजकारणाच्या ड्रीष्टीने वापर करून घेण्यासाठी त्यांच्याकडे अधिक सक्षम जबाबदारी दिली गेली पाहिजे, असे मत काँग्रेस हायकमांडचे आहे. त्यातूनच पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये विचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा संसदीय कार्यप्रणालीतील अनुभव, अभ्यास लक्षात घेऊन त्यांची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदाकरता होऊ शकेल अशा दृष्टीने हालचाल सुरू आहे.


No comments:

Post a Comment