Thursday, May 21, 2020

कराड जिमखान्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाखाची मदत


कराड
येथील कराड जिमखान्याच्या वतिने मुख्यमंत्री सहाय्यता निघीसाठी म्हणून १ लाख रुपयाची मदत  देण्यात आली. या रकमेचा धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचेकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला. यावेळी कराड जिमखान्याचे अध्यक्ष कुमार शाह,जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळी अनेक संस्था, सामाजिक संघटना, निरनिराळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी , नेते आपापल्या पद्धतीने समाजाची अनेकप्रकारे मदत करत आहेत.यातुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे योग्य काम हे सर्वजण पार पाडत आहेत.
कराड जिमखाना ही शहर व परिसरातील विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यासंबंधी अनेक वर्षांपासून अग्रेसर असणारी "वेलनोन' संस्था आहे. विशेषतः क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कराड जिमखान्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. कराड जिमखान्यांने काही वर्षांपूर्वी येथील शिवाजी स्टेडियम येथे रणजी ट्रॉफी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. तालुक्याच्या ठिकाणी हे सामने भरवून वाहवादेखील  मिळवली होती.शहरात पार पडलेले साहित्य सम्मेलन असो किंवा नाट्य संमेलन असो, पशु-पक्षी मित्र संमेलन असो,तसेच संगीताची पर्वणी ठरणारा दरवर्षी होणारा प्रीतिसंगम संगीत महोत्सव असो... असे अनेकविध उपक्रम राबवत या संस्थेने आपले काम समाजापुढे वेळोवेळी ठेवले आहे आणि  आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे. ही संस्था जेव्हा,जेव्हा लोकांसमोर येत असते त्यावेळी आपली बांधीलकी जपते व त्याचे नेहमीच कौतुक होते. याच बांधिलकीचा एक भाग म्हणून या वर्षीचे सर्व उपक्रम रद्द करून कराड जिमखान्यांने त्यातील रकमेचा काही भाग  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरवले. त्यानुसार एक लाखाचा धनादेश नुकताच ना.बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.अडचणीच्या काळात आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न कराड जिमखान्यांने यातून केला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment