Sunday, June 27, 2021

सहकार पॅनेलला विजयी करा... डॉ सुरेश भोसले

वेध माझा ऑनलाइन
रेठरे बुद्रुक : जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 2015 साली कृष्णा कारखान्यात सत्तेवर आल्यानंतर, आम्ही अनेक अडचणीतून मार्ग काढत कृष्णा कारखान्याला आणि कारखान्याच्या सभासदांना पुन्हा वैभवाचे दिवस आणले आहेत. आता येत्या काळात आपल्या कृष्णा कारखान्याच्या साखरेचा ब्रँड देशभर पोहचविण्याचे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठी सभासदांनी आपले पाठबळ भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे करून, सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. 

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथे आयोजित प्रचार सांगता सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद नामदेव धर्मे होते. 

व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, कारखान्याचे व्हॉईस चेअरमन व उमेदवार जगदीश जगताप, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, विलास भंडारे, लिंबाजी पाटील, संभाजीराव पाटील, दत्तात्रय देसाई, संजय पाटील, जे. डी.मोरे,
शिवाजी पाटील, बाजीराव निकम, सयाजी यादव, बाबासो शिंदे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, आम्ही सत्तेवर आलो तेव्हा कारखाण्याची स्थिती अत्यंत वाईट होती. कामगारांना द्यायला पैसे नव्हते. तोडणी वाहतुकीसाठी पैसे नव्हते. डिस्टलरी बंद होती. अशा अडचणीच्या काळात आम्ही कारखाण्याची जबाबदारी स्वीकारली. आज 6 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आम्ही कारखाना सुस्थितीत आणला आहे. यंदाच्या एफआरपी रकमेतील तिसरा हफ्ता सभासदांनी मागितल्यास ती रक्कम दुसऱ्याच दिवशी देण्याची आमची तयारी आहे. 
2010 साली मनोमिलनाचा शब्द पाळायचा म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी आम्ही त्यावेळी पॅनेल उभे केले नाही. पण त्यावेळी पॅनेल टाकले असते तर अविनाश मोहितेंचा उदय झालाच नसता आणि कारखान्याचे एवढे नुकसान झाले नसते. 

सभासदांची आणि कारखाण्याची कुठलीही फिकीर दोन्ही विरोधकांना नाही. विरोधकांनी खोट्या सह्या करून कोट्यवधींचे कर्ज उचलले. ज्यांनी कर्ज काढले नाही अशा 784 लोकांना बँकेच्या नोटीसा आल्याने या लोकांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. हा गुन्हा दाखल झाला असून, यातील दोषी असणारे विरोधी गटाचे लोक जामीनावर बाहेर आहेत. ज्यांना या प्रकरणात शिक्षा झाली ते जामीनावर बाहेर असलेले लोक आता तुमच्यासमोर मते मागायला येत आहेत, हे लोकांनी लक्षात घ्यावे. 

आप्पा 30 वर्षे चेअरमन होते. मदनदादा 10 वर्षे चेअरमन होते. मी 12 वर्षे चेअरमन आहे. या काळात कारखाना खासगी झाला का? जेव्हा कारखाना चांगला चालत नाही त्यावेळीच तो खासगी होतो. किंबहुना तो विरोधकांच्या काळातच खासगी झाला असता, असे वाटते. सततच्या सत्तांतरामुळे कारखाण्याची मोठी अधोगती झाली. पण आता कारखान्याला स्थिरता मिळवून देण्याची गरज आहे. यासाठी सहकार पॅनेलला पाठबळ द्या, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. 

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, गेल्यावेळी आम्ही मोफत साखरेचा शब्द दिला होता तो नक्की पूर्ण केला. यावेळी आम्ही शब्द देतोय की आता ही मोफत साखर घरपोच करू. अनेकांना हे शक्य वाटत नाही. पण तुम्ही सुरेशबाबांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल निवडून द्या. या दिवाळीच्या आधी प्रत्येकाच्या घरात साखरेचे पोते आम्ही घरपोच करतो. 

जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास तोपर्यंत कृष्णा कारखाना खासगी होणार नाही. तो सहकारीच राहील, हा आमचा शब्द आहे. आज आम्ही अनेक सहकारी संस्था चालवितो. पण त्यातील एक तरी संस्था खासगी झाली का? हे दाखवून द्या. कोरोनाच्या काळात एकही पैसा न घेता कृष्णा हॉस्पिटलने काम केले. सुरेशबाबांनी स्वतः कोरोना उपचारात सहभाग घेतला. पण आमच्या चुलत्यांनी मात्र डॉक्टर असतानाही दवाखाना बंद करून रेठऱ्यात राहणे पसंत केले. अशी त्यांची कामगिरी असून, लोकांना ती चांगली माहिती आहे. विरोधक आमच्यावर वैयक्तीक टीका करतात, पण कारखान्याच्या कारभाराबाबत मात्र बोलत नाहीत. कारण त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नाहीत. स्वार्थासाठी मनोमिलन करणारे आज एकमेकांवर बोलायला लागले आहेत. असल्या स्वार्थी लोकांपासून सभासदांनी सावधान राहावे आणि पारदर्शक काम करणाऱ्या सहकार पॅनेलला मतदान करावे, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

मदनराव मोहिते म्हणाले, की २०१० साली अपघाताने सत्तेवर आलेल्या अविनाश मोहितेंनी कारखाना चालवायला चक्क गडी ठेवला. त्याने कारखान्याचे मोठे वाटोळे झाले. या लोकांनी ७८४ लोकांना कर्जात ढकलले. या कर्ज प्रकरणातून व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच त्यांना सत्तेची हाव आहे. अशा लोकांना कारखान्यापासून दूर ठेऊन, कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार पॅनेलला विजयी करा.

यावेळी माजी संचालक संपतराव थोरात, माणिकराव जाधव, जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर, शेतीमित्र अशोकराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संग्राम पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, व्ही. के. मोहिते, ब्रम्हानंद पाटील, मनोज पाटील आदींसह सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment