Friday, June 18, 2021

शिवसेना-राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येऊन लढणार...जयंत पाटील यांनी मिळवला राऊत यांच्या सुरात सूर...

वेध माझा ऑनलाइन
महाविकास आघाडी आगामी निवडणुका एकत्र आणि जोमाने लढेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला केलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल असं पटोले सातत्याने सांगत आहेत. त्यावर  शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये सगळेच स्वबळावर लढत असतील तर या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र हिताचा विचार करुन एकत्र लढावं लागेल, असं म्हटलंय. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याचं दिसत आहे. 

‘महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. त्या दृष्टीने सामनाने मत व्यक्त केल्याचं दिसत आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे. कारण, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी भाजप स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय. तर नाना पटोलेही सातत्याने स्वबळाची भाषा करताना दिसून येत आहेत.

No comments:

Post a Comment