Thursday, June 10, 2021

विरोधकांनी त्यांच्या काळात केवळ भ्रष्ट कारभार केला- डॉ अतुल भोसलेंची टीका

वेध माझा ऑनलाइन
कराड, ता. १० : आम्ही जसे आमच्या प्रचारात गेल्या ६ वर्षातील कारखान्याच्या प्रगतीबद्दल सांगतोय, तसे विरोधक त्यांच्या काळातील कारभाराबद्दल का बोलत नाहीत? विरोधकांनी त्यांच्या काळात केवळ भ्रष्ट कारभार केला. त्यामुळेच त्यांच्याकडे बोलायला कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणूनच निव्वळ बिनबुडाचे आरोप करण्याचा उद्योग त्यांनी सुरू ठेवला आहे, अशी टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. 

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कामेरी (ता. वाळवा) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार बैठकीत ते बोलत होत. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक व उमेदवार संजय पाटील, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, सुनील पाटील, शहाजी पाटील, जयराज पाटील, डॉ. रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले पुढे म्हणाले, की डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कृष्णा कारखान्यात प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे कारभार करत आहे. विद्यमान संचालक मंडळाने गेल्या ६ वर्षात मोफत साखर, पारदर्शक तोडणी यंत्रणा, उच्चांकी ऊसदर, सर्वाधिक साखर उतारा, मोबाईलवरून शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद यासारखे सभासद हिताचे निर्णय घेतले. याऊलट विरोधकांनी त्यांच्या काळात एफआरपी पूर्ण करण्यासाठीसुद्धा कर्ज उचलले होते. सभासदांनी गेल्या सहा वर्षातील आमचा कारभार जवळून बघितला आहे. पण विरोधकांना चांगले चाललेले दिसत नाही. विरोधकांनी कारभारच भ्रष्ट केल्याने त्यांची दृष्टीही तशीच बनली आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तींना बाजूला सारून पारदर्शक कारभारासाठी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले. 

ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील म्हणाले, सहकार वाचला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सहकार पॅनेलला साथ दिली. डॉ. सुरेशबाबांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट सुरू आहे. आप्पासाहेबांचे या भागावर असणारे उपकार लोक कधीही विसरणार नाहीत. चांगल्या कामाच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभे राहून सहकार पॅनेलला जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत. 

डॉ. सुरेश भोसले यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कारखाना चालवून, सभासद हित जोपासले आहे. त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटलने कोरोना काळात केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे आम्ही सर्व कामेरीकर सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे सुनील पाटील यांनी सांगितले. 

यावेळी उमेदवार संजय पाटील, जयराज पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. छगन पाटील, विलास पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, दिलीप जाधव, शशिकांत पाटील, दादासो पाटील, जयदीप पाटील, संपतराव पाटील, जितेंद्र पाटील, विनायक पाटील, सूर्यकांत पाटील, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment