कराड, ता. १५ : रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाठार (ता. कराड) येथे सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे निवडणूक प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या हस्ते व मदनराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन व उमेदवार जगदीश जगताप, संचालक व उमेदवार दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, निवासराव थोरात, विद्यमान संचालक पैलवान शिवाजीराव जाधव, पांडुरंग होनमाने, सुजीत मोरे, सहकार पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय देसाई, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते म्हणाले, की कृष्णाकाठची सर्व जनता व सभासद सहकार पॅनेलच्या पाठीशी आहेत. शेतकरी संघटनेच्या लोकांनीही सहकार पॅनेलला पाठींबा दिला आहे. दुसरीकडे विरोधकांचे मात्र अजूनही एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी एकच धोरण ठेवावे, ‘माझा कारखाना माझी जबाबदारी’. कारखाना वाचला तरच सभासद जगणार आहे. त्यामुळे गट तट न मानता सर्वांनी झटून प्रचाराला लागावे आणि सहकार पॅनेलला विजयी करावे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की ज्येष्ठ नेते भीमरावदादा आणि मदनदादा यांनी प्रचाराचा शुभारंभ केल्याने सहकार पॅनेलचा आता विजयी प्रवास सुरू झाला आहे. गेल्या ६ वर्षात सहकार पॅनेलने सभासदांच्या अपेक्षा चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. आज कारखाना भक्कम स्थितीत आहे. अनेक लोक सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असून, त्यांच्या पाठिंब्यामुळे सहकार पॅनेलची व्याप्ती वाढली असून, ही निवडणूक एकतर्फी व्हायला हरकत नाही. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले यांनीही सहकार पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment