वेध माझा ऑनलाइन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी पुण्यात हे दोन्ही नेते भेटणार होते. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही भेट लांबवणीवर पडण्यामागे नेमकं कारण काय असावं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मात्र, उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत. सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment