Sunday, June 6, 2021

त्यांना कामधंदा नाही म्हणून ‘ती’ गोष्ट उकरून काढताहेत ; अजित पवारांचा फडणविसाना टोला

वेध माझा ऑनलाइन
अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करणं ही चूक होती, अशी कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अजितदादांना सत्ता स्थापन करता येते, पण टिकवता येत नाही, असं सांगत निशाणा साधला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना काही कामधंदा नाही. त्यामुळे ते ती गोष्ट उकरून काढत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे

अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. त्या गोष्टीला आता 14 महिने झाले आहेत. तरीही मागची गोष्ट उकरून काढत आहेत. ज्यांना काही काम नाही ते लोकं या गोष्टीवर बोलत आहेत, असा टोला लगावतानाच आज आनंदाचे वातावरण आहे. त्याकडे लक्ष द्या, असं पवार म्हणाले.


पाटलांना आम्हीच आमदार केलं
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी बॉम्बची भाषा केली होती. त्यावरूनही त्यांनी नरेंद्र पाटलांवर टीका केली. काही लोक भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलतात. कायदा आणि संविधान काही बघत नाहीत. अशा स्टेटमेंट झाल्याने बातम्या उचलून धरल्या जातात. ही लोकं एकेकाळी आमच्याबरोबर होती. त्यांचा अवाका आम्हाला माहीत आहे. शरद पवारही या लोकांना ओळखून आहेत. आम्हीच त्यांना आमदार केलं होतं. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही, असं ते म्हणाले.

गायकवाड कमिशनवरच कोर्टाचा सवाल
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आपल्या न्याय व्यवस्थेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची संधी आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच बेंचने निकाल दिला आहे. हा निकाल नीट वाचा. जवळच्या वकिलांना विचारा. त्यात कोर्टाने गायकवाड कमिशनवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत, असा दावा पवार यांनी केला.

काही लोक भडकावण्याचं काम करत आहेत
काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला भडकावण्याचं काम करत आहेत. पण कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटलो. आणखी वरिष्ठ नेत्यांना भेटायचं आहे. लवकरच भेटणार आहोत, असंही ते त्यांनी सांगितलं

No comments:

Post a Comment