Sunday, June 20, 2021

भोसलेंनी "कृष्णेच्या' सत्तेतून स्वतःचा स्वार्थ साधला... विंग येथे रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ना विश्वजीत कदमांचा घणाघात...

वेध माझा ऑनलाइन
कराड, प्रतिनिधी : कृष्णेच्या सभासदांना ऊस दरासाठी परिवर्तन हवे आहे. ज्यांनी आजपर्यंत कारखान्याच्या सत्तेतून स्वतःचा स्वार्थ साधला. व सभासदांना केवळ दिवास्वप्ने दाखवली. त्यांना रयत पॅनेलची शिट्टी वाजवून या निवडणुकीत घरी बसवा. कामावरून काढून टाकतो. असा डोस देणाऱ्यांची संस्था चाळीस एकरात आहे. पण भारती विद्यापीठ चारशे एकरात आहे. याची त्यांना जाणीव असावी. असा अप्रत्यक्ष टोला सुरेश भोसले व अतुल भोसले यांना नाव न घेता लगावत सभासदांनी काळजी करू नये, मी तुमच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांनी दिली. तर कृष्णा कारखान्यात सर्व उच्चांकी घडतेय, असे म्हणणारे सत्ताधारी ऊसदर देण्यात मागे का आहेत. ऊस दराबाबत मग कारखाना कामकाजात कोरोना झाला आहे का? असा सवाल डॉ. इंद्रजित मोहिते यांनी यावेळी उपस्थित केला.

विंग (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ना. कदम व डॉ. मोहिते बोलत होते. कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड उत्तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश नलवडे, कराड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, धनाजी बिरमुळे, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, विंगच्या सरपंच शुभांगी खबाले, आदित्य मोहिते, रामराव नांगरे- पाटील, कृष्णेचे माजी संचालक जयसिंगराव कदम, हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर, सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

ना. कदम म्हणाले, काही मंडळींनी सत्ता व स्वतःचे खिसे भरण्यासाठी व कारखाना पोकळ करण्याच्या भूमिकेने भाऊंचे विचार सोडले. सभासदांनी पुन्हा एकदा इंद्रजित बाबांच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा. निश्चित तुमचे भविष्य उज्वल होईल. ही निवडणूक परिवर्तनाची लढाई आपण ताकदीने व हिम्मतीने लढायची आहे. 

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, गेल्या अकरा वर्षात भाऊंच्या विचारांना इजा पोहचवली आहे. विद्यमान संचालक मंडळाने १५ बिले दिली. यावर कोण बोलतय का? कारखान्याच्या मालकीच्या संस्था गिळंकृत केल्या. व खाजगी झाल्या आहेत. पण आपण विकेंद्रित सहकारी संस्था उभारू. कृष्णा कारखान्याचा सांभाळ करत तो वाढवायचा व प्रगतीपथावर न्यायचा आहे. यासाठी रयत पॅनेलला बहुमताने निवडून द्या.

ते म्हणाले, येत्या पाच वर्षात कारखाना सहकारी तत्वावरील कारखाना राहिला पाहिजे. हा आमचा आग्रह आहे. तो कारखाना सहकारी न राहता कोणत्या तरी एका खाजगी कारखान्याचे दुसरे युनिट होवू नये. किंवा एखाद्या चालबाज लेखणी बहादराच्या मालकीचा होवू नये, याची काळजी करावी.
मनोहर शिंदे म्हणाले, मतदानापासून वंचित ठेवणारे विद्यमान संचालक मंडळ आहे. सभासदांनी इंद्रजित मोहिते यांच्या कारभाराची तुलना इतरांशी करावी. कारखान्याला वेळ देणारे आणि अभ्यासू असलेल्या इंद्रजित बाबांना साथ द्यावी.
अशोकराव यादव यांनी प्रास्ताविक केले. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. अधिकाराव गरुड, इस्लामपूरचे माजी नगरसेवक संपतराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांची भाषणे झाली. अशोकराव यादव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment