कराड
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत २२ अर्ज अवैध ठरले असून, यामध्ये रयत व संस्थापक पॅनेलच्या मातब्बर उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या दोन्ही पॅनेलना जोरदार धक्का बसला आहे. यात महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे चुलते आणि रयत पॅनेलचे नेते रघुनाथ श्रीपती कदम यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तसेच संस्थापक पॅनेलचे उमेदवार डॉ. अजित देसाई व त्यांच्या पत्नी माजी संचालिका सौ. उमा अजित देसाई, तसेच विद्यमान संचालक अशोक मारूती जगताप यांचे सुपूत्र अभिजीत जगताप यांच्यासह अनेकांचे अर्ज अवैध ठरल्याने, रयत व संस्थापक पॅनेलला जोरदार धक्का बसला आहे.
सहकार कायद्यातील तरतुदीनुसार आणि कारखाना पोटनियम २८ (२) अनुसार सभासदाने कारखान्यास ५ गळीत हंगामपैकी किमान ३ वेळा ऊसपुरवठा करणे गरजेचे असते. ज्येष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम यांचे बंधू रघुनाथ कदम हे कृष्णा कारखान्याचे सभासद आहेत, मात्र त्यांनी कारखान्याला सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१९-१९२०, २०२०-२१ अशा ५ वर्षात एकदाही ऊसपुरवठा केलेला नाही.
संस्थापक पॅनेलचे उमेदवार डॉ. अजित देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे कृष्णा कारखान्याची निवडणुक तातडीने घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र त्यांनीही कारखान्यास नियमानुसार ऊस गळीतास पाठविलेला नाही. याचबरोबर इतरही अन्य २० उमेदवारांनी या नियमानुसार ऊस गळीतास न पाठविल्याने या सर्व २२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले.
यामध्ये संस्थापक पॅनेलमधून अर्ज दाखल केलेले वडगाव हवेली-दुशेरे गटातील उमेदवार अभिजीत अशोक जगताप, विजय भगावन जगताप, कार्वे-काले गटातील उमेदवार शिवाजी तुकाराम देसाई, सौ. उमा अजितकुमार देसाई, अजित अनंत देसाई, विकास दिनकर देसाई अशा एकूण ६ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच रयत पॅनेलमधून अर्ज दाखल केलेले वडगाव हवेली-दुशेरे गटातील उमेदवार विशाल संभाजी पाटील, रेठरे हरणाक्ष – बोरगाव गटातील उमेदवार विलास जयवंत शिंदे, शहाजी पतंगराव पाटील, येडेमच्छिंद्र – वांगी गटातील प्रतापसिंह आनंदराव जाधव, रेठरे बुद्रुक-शेणोली गटातील उमेदवार रघुनाथ श्रीपती कदम अशा एकूण ५ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
तसेच अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले विश्वास आत्माराम शिंदे, गजानन सुभाष जगताप, तानाजी पांडुरंग खबाले, उत्तम विष्णू खबाले, विजय निवृत्ती पाटील, अवधुत भीमराव जाधव पाटील, रघुनाथ शामराव खोत, भारत हिंदुराव पाटील, मुकुंद दिगंबर जोशी, विश्वास पांडुरंग जाधव, दिलीप शामराव सावंत अशा एकूण ११ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
ऊस पुरवठा न केल्याने उमेदवारी आली धोक्यात!
आज झालेल्या छाननीत ज्या २२ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले, त्यांची उमेदवारी नियमानुसार कारखान्यास ऊस गळीतास न पाठविल्याने धोक्यात आली आहे. कारखान्याची अंतिम मततदार यादी जाहीर होताना, राज्याच्या सहकारमंत्र्यांनी ८२० सभासदांची नावे स्वतंत्र पुरवणी यादीद्वारे मतदार यादीत समाविष्ट केली होती. या यादीत समाविष्ट असणारे गजानन सुभाष जगताप व तानाजी पांडुरंग खबाले यांचाही उमेदवारी अर्ज याच कारणामुळे अवैध ठरला आहे.
No comments:
Post a Comment