ताकारी, ता. १९ : राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय, राजारामबापू दूध संघाचे चेअरमन व महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. ताकारी (ता. वाळवा) येथे झालेल्या एका बैठकीत श्री. पाटील यांनी सहकार पॅनेलचे युवा नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत, सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी रेठरे हरणाक्ष – बोरगाव गटातील उमेदवार जितेंद्र पाटील, जे. डी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपला पाठिंबा जाहीर करताना विनायक पाटील म्हणाले, की वाळवा तालुक्यातील राजकारणात आम्ही नेहमीच जयंत पाटील साहेबांचे नेतृत्व मानतो. तर कृष्णा सहकार कारखान्याच्या बाबतीत आम्ही डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाला पसंती देत आलो आहोत. अगदी आप्पासाहेबांच्यापासून आमचे भोसले कुटुंबियांशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. सर्वसामान्य सभासदाचे अडलेले कुठलेही काम त्वरीत करण्यात डॉ. सुरेशबाबा व डॉ. अतुलबाबा नेहमी तत्पर असून, सहकार पॅनेलच्या नेतृत्वाखालीच कृष्णा कारखान्याची प्रगतिशील वाटचाल शक्य आहे. म्हणूनच ताकारीसह या भागातील सर्वांनीच सहकार पॅनेलच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की विनायकअण्णा हे ना. जयंत पाटील साहेबांचे विश्वासू शिलेदार असून, त्यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाने राजारामबापू दूध संघाला नावारूपाला आणले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे सहकार पॅनेलला मोठे बळ प्राप्त झाले आहे. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी नेहमीच कृष्णा कारखाना राजकारणापासून अलिप्त ठेवला आहे. तोच वारसा जपत सभासदहित हा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही कार्यरत आहोत आणि इथन पुढेही कार्यरत राहू.
यावेळी सरपंच अर्जुन पाटील, शशिकांत पाटील, जगन्नाथ पाटील, शिवाजी पाटील, नानासाहेब महाडिक पतसंस्थेचे चेअरमन प्रा. प्रदीप पाटील, सुभराव पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, सुभाष पाटील, सागर पाटील, जे. जे. पाटील व सर्व सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment